लठ्ठपणामुळे भारती त्रस्त आहे. डॉक्टरांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे; परंतु वजन कसे कमी करायचे, हा तिच्यापुढे मोठा प्रश्न आहे. कारण खाण्यावर तिचे नियंत्रण नाही. ही जगभरातील समस्या आहे. लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत लठ्ठ होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकताच ‘वर्ल्ड ओबेसिटी डे’ जगभरात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने लठ्ठंभारतींची जी आकडेवारी प्रसिद्ध झाली ती धक्कादायक म्हणावी लागेल. १९८० साली जगभरात लठ्ठ लोकांची जेवढी संख्या होती त्याच्या दुपटीहून अधिक संख्या झाली आहे. अर्थात अमेरिका यात पहिल्या क्रमांकावर असली तरी भारतानेही चिंता करावी अशी स्थिती आहे. पहिल्या दहा लठ्ठंभारती लोकांमध्ये भारत व चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरातील लठ्ठ लोकांची संख्या ही २१० कोटी एवढी असून अमेरिकेतील लठ्ठ लोकांचे प्रमाण १३ टक्के एवढे आहे. चीन आणि भारतात हेच प्रमाण १५ टक्के असून भारतातील लठ्ठ व जास्त वजन असलेल्यांची संख्या सहा कोटींपेक्षा अधिक आहे. पंजाब, केरळ, गोवा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशापाठोपाठ महाराष्ट्र व गुजरातचा क्रमांक यात लागतो. अर्थात लठ्ठभारतींमध्ये तरी महाराष्ट्र गुजरातपेक्षा आघाडीवर आहे.
भारतात एकीकडे कुपोषित लोकांचे प्रमाणही खूप मोठे आहे, तर दुसरीकडे लठ्ठ होणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. या लठ्ठपणावर नियंत्रण आणले नाही तर मधुमेह, हृदयविकार, मज्जासंस्था, कर्करोग तसेच रक्तदाबासारखे आजार होऊ शकतात, असे विख्यात एंडोक्रोनॉलॉजिस्ट व मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. एकीकडे पालक लहान मुलांना पिझ्झा, बर्गरपासून वडापावपर्यंतचे जंक फूड खायला देतात, तर दुसरीकडे नोकरदार महिलांमध्येही खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल झाल्यामुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे. वेळच्या वेळी व संतुलित आहार आणि नियमित चालण्याच्या व्यायामाने वजनावर नियंत्रण म्हणजेच आजारांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. तथापि शहरांमधील वेगवान जीवनशैलीमुळे आहाराचा गांभीर्याने विचारही कोणी करण्यास तयार नसल्याचे डॉ. जोशी यांचे म्हणणे आहे. परिणामी मधुमेहाच्या रुग्णांची संख्या कमालीच्या वेगाने वाढत असून लवकरच भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी बनेल अशी भीतीही डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केली. अनावश्यक जागरण टाळून पुरेशी झोप घेणे हेही अत्यावश्यक असून वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे हे प्रत्येकासाठी अत्यावश्यक आहे. अलीकडेच लहान मुलांमधील वाढत्या वजनाबाबत शासकीय व खासगी शाळांमध्ये एक सर्वेक्षण झाले होते. यामध्ये खासगी शाळांमधील मुलांचे वजन आवश्यकतेपेक्षा खूपच वाढल्याचे दिसून आले. जवळपास साठ टक्के मुलांचे वजन हे प्रमाणापेक्षा जास्त असून पालकांनी याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. जास्त वजन असलेल्या मुलांमध्ये मधुमेहापासून हृदयविकारापर्यंत अनेक त्रास उद्भवत असल्याचे दिसून येत असून ‘वर्ल्ड ओबेसिटी डे’च्या पाश्र्वभूमीवर मोजके व सकस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेण्याचा संकल्प करून त्याचे पालन करू या अशी अपेक्षा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.