‘मागच्या जन्मी तुम्ही कोण होता?’, ‘तुमचे खरे लक कोण आहे?’, ‘तुमचा नवरा तुमच्याबद्दल काय विचार करतो?’, ‘तुम्हाला कोणतं नाव शोभेल?’, ‘पुढील जन्मी तुम्ही कोण असाल?’, ‘तुमच्यावर कोण जास्त प्रेम करते?’, ‘लोकं तुम्हाला काय समजतात?’, ‘तुमचा मृत्यू कसा होणार?’ असल्या प्रश्नांची तुम्ही फेसबुकवर उत्तरे शोधत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण असल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या नादात तुम्ही स्वत:ची माहिती चुकीच्या लोकांपर्यंत पोहचवत आहात. अशाच एका अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पाच कोटी अमेरिकन जनतेची खाजगी माहिती केंब्रिज अॅनालिटिका या संस्थेला पोहचली आणि त्याचा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वापर झाल्याची कबुली मार्क झुकरबर्गने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केली आहे.

मार्क आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीतो की ‘२०१३ मध्ये केंब्रिज विद्यापीठामधील रिसर्चर अलेक्झांडर कोगनने पर्सनॅलिटी क्विझ अॅप तयार केला. या अॅपचा जवळपास ३ लाख लोकांनी वापर केला. त्यांनी स्वतःची तसेच मित्रांची खासगी माहिती या अॅपवर शेअर केली. २०१४ मध्ये फेसबुकने धोरणात बदल केला. आता कोगनच्या अॅपवर मित्रांची माहिती शेअर करता येणार नव्हती. यासाठी मित्राकडेही ते अॅप असणे बंधनकारक झाले. २०१५ मध्ये कोगनने या अॅपद्वारे मिळालेली माहिती ‘केंब्रिज अॅनालिटिका’ला दिल्याचे समोर आले. यानंतर आम्ही तातडीने कोगनच्या अॅपवर बंदी टाकली. तसेच कोगन आणि केंब्रिज अॅनालिटिकानेही त्यांना मिळालेला डेटा डिलीट करावा, अशी सूचना केली. त्यांनी डेटा डिलीट केला नाही, हे गेल्या आठवड्यात समोर आल्यानंतर आम्ही केंब्रिज अॅनालिटिकावरही बंदी घातली.’

आता यावरून हे स्पष्ट झाले आहे की अलेक्झांडर कोगनच्या ‘पर्सनॅलिटी क्विझ’ या थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून ही डेटा चोरी झाली. आणि ज्यांचा डेटा चोरी झाला त्यांना याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळेच यापुढे असे थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्स त्यातही अनऑथराईज डेव्हलपर्सकडून तयार करण्यात आलेले अॅप्स वापरण्याआधी अनेकदा विचार करणे गरजेचे झाले आहे.

अॅप वापरताना घ्यायची काळजी

तुम्ही फेसबुकवरून वर सांगितल्याप्रमाणे काही क्विज किंवा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘लॉग इन विथ फेसबुक’ चा पर्याय निवडला असेल तर तुमची बरीचशी खाजगी माहिती त्या अॅप निर्मात्यांकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फेसबुकच्याच ब्लॉगवरील माहितीप्रमाणे फेसबुकवरील प्रत्येक अॅप्लिकेशनकडे युझर्सची बरीच खाजगी माहिती असते. यामध्ये प्रामुख्याने लिंग, फ्रेण्ड सर्कल, युझरनेम, इमेल आयडी, संपूर्ण नावाबरोबरच त्या युझरचा डीपीही समावेश होतो. तसेच युझरची संपूर्ण फ्रेण्डलिस्ट त्यांच्याकडे असते ज्याच्या माध्यमातून ते तुमची आणि त्यांची बरीचशी माहिती गोळा करतात.

तुम्ही एखादे अॅप्लिकेशन वापरताना तुमच्या मोबाईलमधील किंवा सोशल मिडीयावरील कोणत्या कोणत्या गोष्टी अॅक्सेस करण्याची परवाणगी देताय ते एकदा पाहून घ्या.