17 November 2019

News Flash

‘नाक’ टोचत आहात.. पण, जरा जपूनच!

भारतीय संस्कृतीत स्त्रियांनी नाक टोचण्याची परंपरा असली तरी सध्या फॅशन म्हणून नाक टोचण्याचे प्रकार वाढले आहेत.

काही ठिकाणी नाक टोचण्यासाठी ‘गन शॉट’सारख्या हानीकारक पद्धतीचा वापर केला जातो. हा मार्ग फारसा सुरक्षित नसल्याने तरुणींना नाक टोचायचेच असेल तर त्यासाठी पारंपरिक पद्धतच अवलंबवावी, असे या क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

* तरुणींमध्ये ‘नोज रिंग’,‘नोज पिन’ची क्रेझ
* मात्र, नाक टोचण्यासाठी पारंपरिक पद्धतच सुरक्षित
भारतीय संस्कृतीत स्त्रियांनी नाक टोचण्याची परंपरा असली तरी सध्या फॅशन म्हणून नाक टोचण्याचे प्रकार वाढले आहेत. नाकाच्या दोन्ही पडद्यांबरोबरच मधल्या नाकपुडय़ांमध्ये टोचण्याची मोठीच ‘क्रेझ’ सध्या तरुणींमध्ये आहे. त्यासाठीचे ‘पिअर्सिग स्टुडिओ’ मुंबईत आता अनेक ठिकाणी दिसतात. मात्र यापैकी काही ठिकाणी नाक टोचण्यासाठी ‘गन शॉट’सारख्या हानीकारक पद्धतीचा वापर केला जातो. हा मार्ग फारसा सुरक्षित नसल्याने तरुणींना नाक टोचायचेच असेल तर त्यासाठी पारंपरिक पद्धतच अवलंबवावी, असे या क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
भारतात १६व्या शतकात मुघलांच्या काळात नाक टोचण्याची परंपरा सुरू झाली. त्यावेळी ‘नाक टोचणे’ ही स्त्री विवाहित असल्याचे द्योतक मानले जाई. त्यानंतर डाव्या बाजूला नाक टोचण्याचा संबंध स्त्रियांच्या बाळंतपणाशी जोडला जाऊ लागला. महाराष्ट्रात खडे व मोत्यांनी बांधलेल्या नथीने महिलांच्या सौंदर्यात भर टाकण्याचेच काम केले आहे.
सध्याच्या तरुणी ‘नोज रिंग’ फॅशन म्हणून घालतात. टेनिसपटू सानिया मिर्झा, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील राधा म्हणजेच मुक्ता बर्वे यांना ‘नोज रिंग’ने ‘बोल्ड’पणा मिळवून दिला.
मुंबईत हिल रोड, लिंक रोड, कुलाबा कॉजवे येथे नव्या पद्धतीच्या ‘नोज रिंग’ सहज आणि आपल्या खिशाला परवडतील या दरात उपलब्ध आहेत. २० ते ५०-६० रुपयांपर्यंतच्या नोज रिंग उपलब्ध आहेत. आता ‘ऑनलाइन शॉपिंग’नेही दोन ते चार हजापर्यंत खडय़ांच्या, सुंदर नक्षीकाम केलेल्या नोज रिंगना व नोज पिनना जागा मिळवून दिली आहे.
मुंबईत ठिकठिकाणी ‘पिअर्सिग स्टुडिओ’ उपलब्ध आहेत. तरुणी संस्कृतीबरोबरच फॅशन म्हणूनही नाक टोचतात. जाहिरात क्षेत्रातील व्यक्ती, फॅशन डिझायनर, महाविद्यालयीन तरुण जास्त प्रमाणात या प्रकाराकडे आकर्षित होत आहेत, असे मालाडमधील ‘बॉडी कॅनवास पिअर्सिग स्टुडिओ’चे मालक विकास मलानी यांनी सांगितले. ‘सेपटम’ म्हणजेच नाकपुडय़ांमध्ये टोचण्याच्या प्रकाराचीही चांगली चलती आहे.
मात्र, सध्या काही ठिकाणी नाक टोचण्यासाठी प्रचलित असलेली ‘गन शॉट’ पद्धती सुरक्षित नसल्याचे मलानी यांनी सांगितले. त्यामुळे शरीरासाठी सुरक्षित असलेल्या सर्जिकल सुईच्या साहाय्यानेच नाक टोचले जावे. कारण, यामुळे शरीराला कुठलाच धोका होत नाही, असे त्यांनी सुचविले.
बोल्ड लुक
नाकात घालणाऱ्या दागिन्यांमध्ये ‘नोज रिंग’,‘नोज पिन’, ‘अर्धवर्तुळाकार नोज रिंग’ असे बरेच प्रकार आहेत. यापैकी नोज पिनची जास्त चलती आहे. बऱ्याचदा सोन्याची किंवा विविध रंगांच्या खडय़ांमधील नोज पिन पेहरावाच्या रंगानुसार जुळवून घेता येते. हॉलिवूडमधील बरेच संगीतकार आणि गायक फॅशन म्हणून नोज रिंग घालतात. यात मिली सायरस, लेडी गागा, पेरी अ‍ॅडवर्ड्स, जॉर्डिन स्पार्क्स यासारखे अनेक ‘पॉप स्टार्सर्’ ‘नथवारी’ करीत आहेत. नोज पिनमुळे स्त्रियांचे सौंदर्य वाढते. परंतु नोज रिंगमुळे तुमचा लुक बदलतो. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाला बोल्डपणा येतो. चित्रपटात बोल्ड व्यक्तिचित्र साकारणाऱ्या अभिनेत्री ऑक्साईट किंवा चंदेरी रंगाच्या नोज रिंग वापरतात. उर्वशी ढोलकीया, सुधा चंद्रा या हिंदी मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका करताना नोज रिंगचा वापर करतात.
नाकपुडीच्या पडद्यात रिंग
भारत, नेपाळ, बांगलादेशमधील ग्रामीण भागात हा प्रकार जास्त आढळतो. दक्षिण भारतातील कूचीपुडी आणि भरतनाटय़म् या शास्त्रीय नृत्यामध्ये नाकपुडय़ाच्या पडद्यात रिंग घालण्याची पद्धत आहे.

बंगालची ‘नोलक’
मूळची कलकत्त्याची असलेली जाग्यसेनी बिस्वास नाकपुडय़ाच्या पडद्यात रिंग घालते. १०० वर्षांपूर्वी बंगालमध्ये स्त्रिया नाकपुडय़ाच्या पडद्यात रिंग घालत असत. परंतु त्यांची रिंग ही ओठांपर्यंत यायची आणि त्याला ‘नोलक’ म्हटले जायचे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मीदेखील नाक टोचले, असे जाग्यसेनी सांगते; तर ‘नाक टोचल्यामुळे आपण सुंदर व आकर्षक तर दिसतोच. शिवाय पाश्चात्त्य कपडय़ांमध्येही नाकात चमकणारा खडा पारंपरिक ‘लुक’ देतो’ असे कामिनी चांदा या तरुणीला वाटते.

First Published on November 17, 2015 9:44 am

Web Title: be carefull while prick the nose
टॅग Fashion,Girls,Lifestyle