बीटाच्या वैशिष्टय़पूर्ण लाल रंगासाठी कारणीभूत ठरणारा घटक स्मृतिभ्रंशाला आळा घालण्यास उपयुक्त ठरु शकत असल्याचा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे. अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांना स्मृतिभ्रंशाशी संबंधित असलेल्या आणि मेंदूमध्ये सदोष प्रथिनांचा साठा होण्याच्या गतीला कमी करणारा घटक बीटामध्ये आढळून आला आहे.

या शोधामूळे स्मृतिभ्रंशाच्या उपचारास प्रभावी ठरणाऱ्या नव्या प्रकारच्या औषधाचा विकास करण्यात मदत होणार आहे, असे दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठाच्या ली जून मिंग यांनी म्हटले आहे.  आमच्या अभ्यासानुसार बीटाच्या अर्कात आढळणारा बिटानीन हा घटक स्मृतिभ्रंशाच्या वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या मेंदूतील विशिष्ट रासायनिक प्रक्रियांचे अवरोधक असल्याचे गुणधर्म दाखवीत आहे, असे मिंग यांनी सांगितले.

आमचा शोध स्मृतिभ्रंशाची औषधे तयार करण्यासाठी उपयोगी ठरेल. त्याचप्रमाणे बिटानीनसारख्या संरचनांना शोधण्यासाठी वैज्ञानिकांना प्रोत्साहित करतील, अशी आमची आशा आहे. यामुळे या स्मृतिभ्रंशाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांचे आयुष्य सुलभ होण्यास मदत होईल.

हा प्रगतिशील आणि अपरिवर्तनीय मेंदूचा विकार नेमका कशामुळे होतो याचा शोध वैज्ञानिक लावत आहेत. दरम्यान, बेटा-अ‍ॅमिलॉइड या प्रथिनांचा मेंदूत होणारा साठा मेंदूच्या पेशी आणि न्यूरॉन्समधील संपर्कात व्यत्यय आणतो. यामुळे स्मृतिभ्रंश होत असावा, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. बेटा-अ‍ॅमिलॉइड हे मेंदूतील धातूंच्या संपर्कात येऊन त्यांना एकत्रितपणे सदोष करते यामुळे ऑक्सिडायजेशनच्या प्रक्रियेला चालना मिळून कलांतराने ही प्रथिने नष्ट होतात. या प्रक्रियेत बिटानिनचा वापर केल्याने होणाऱ्या बदलांचा वैज्ञानिकांनी अभ्यास केला. यावेळी बेटा-अ‍ॅमिलॉइड कोणतीही ऑक्सिडायजेशनच्या प्रक्रियेत ९० टक्क्यांनी घट झाल्याचे आढळून आले.