अधिक मानधन असतानाही अविवाहित असलेल्यांच्या तुलनेत कमी मानधन असतानाही विवाह केलेल्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विवाहामुळे नैराश्यात मोठय़ा प्रमाणात घट होत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे विवाहित जोडप्याची कमाई अधिक असली तरी त्यांना मानसिक आरोग्यासाठी त्याचा कोणताच लाभ होत नसल्याचेही अमेरिकेतील जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. ‘सोशल सायन्स रिसर्च’ या मासिकात हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

त्याचप्रमाणे अविवाहितांचे उत्पन्न कितीही असले तरी त्यांचे मानसिक आरोग्य अधिक कमाई करणाऱ्या विवाहित जोडप्यांप्रमाणेच बिघडलेले असते, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधकांनी अमेरिकेतील २४ ते ८९ वयोगटातील प्रौढांचा अभ्यास करून हे संशोधन मांडले आहे. या सर्वेक्षणात सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य या घटकांचा समावेश आहे. संशोधकांनी अविवाहित, विवाहित आणि नव्याने विवाहबद्ध झालेल्यांची माहिती घेतली आहे. आम्ही या अभ्यासात विवाह, उत्पन्न आणि मानसिक आजार या घटकांमधील सहसंबंध तपासण्याचा प्रयत्न केला. विवाह केल्यामुळे मानसिक   लाभ आणि नैराश्यातून होणारी सुटका या बाबी स्पष्ट झाल्याचे जॉर्जिया विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक लेनॉक्स केल यांनी सांगितले.

त्याच वेळी अधिक उत्पन्न असलेल्या विवाहित जोडप्यांमध्येही मानसिक आरोग्याची समस्या असल्याचे उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र सर्व प्रकारच्या नैराश्यामध्ये हे संशोधन लागू होत नसल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले.