मधुमेहावर अनेक उपाय करूनदेखील फायदा होत नसल्यास जांभळामुळे साखर नियंत्रित करणे शक्य होते. चवीला छान लागणारे जांभूळ साखरेबरोबरच अनेक आजारांवर नियंत्रण ठेवते. जांभळाच्या सेवनाचे अनेक फायदे असून, विविध आजार दूर ठेवता येऊ शकतात. जाणून घेऊया जांभळाचे फायदे –

रक्तातील साखरेवर चांगले औषध – रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जर का तुम्हाला कारल्याचा कडू रस प्यायचा नसेल, तर पारंपारिक औषध असलेल्या जांभळाचा वापर करू शकता. जांभळात ग्लूकोसाइड तत्व असून, जम्बोलन नावाने ते ओळखले जाते. या तत्वाचा अॅण्टी-डायबेटिक प्रभाव पडतो. यात साखरेची मर्यादा ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची क्षमता असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे. त्याचबरोबर मधुमेहामुळे होणारे अन्य त्रासदेखील कमी करण्यास मदत होते. जांभळातील ग्लाइमिक इंडेक्समुळे ५ ते ७ जांभळे खाल्ल्याने अथवा एक कप गरम पाण्यात एक चमचा जांभळाची पावडर मिसळून दिवसातून दोनदा असे पाणी प्यायलाने लाभ होतो.

पचनासाठी फायदेशीर – जांभळातील औषधी गुणवत्तेमुळे केवळ शरीरातील साखरच नियंत्रणात येत नाही, तर पचनक्रियेसाठीदेखील याचा फायदा होतो. जांभळाच्या सेवनाने पोटाशी निगडीत अनेक समस्या दूर होतात. कॅल्शिअम, आयर्न, पोटॅशिअम आणि विटॅमिन सीसारखी शरीराला फायदेशीर असणारी अनेक तत्वे जांभळामध्ये असतात.

हृदयविकारावर गुणकारी – जांभळात पोटॅशिअमची मात्रा अधिक असते. १०० ग्रॅम जांभळाच्या सेवनाने शरीराला ५५ मिलीग्रॅम पोटॅशिअम मिळते. परिणामी दृदयाचा झटका, उच्च रक्तदाब आणि अर्धांगवायूचा धोका कमी होतो. त्याचबरोबर जांभळातील अॅलेजिक अॅसिड, अँथोसाइनिंससारखी अनेक तत्वे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

हिमोग्लोबिनमध्ये वाढ – जांभूळ हाडांसाठी जसे गुणकारी आहे तसेच ते रक्तासाठीदेखील फायदेशीर आहे. अॅनिमिक लोकांसाठी जांभूळ सेवन एखाद्या संजीवनी बुटीसारखेच आहे. जांभळाच्या नियमित सेवनाने रक्तामधील हिमोग्लोबिनच्या स्तरात वाढ होत असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे.