लंडन : शरीरिकदृष्टय़ा अधिक सक्रिय असणे हे हृदयरुग्णांना वजन घटविण्यासाठी अधिक उपयुक्त आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे.

नार्वेजियन विद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान येथील  संशोधकांना एका अभ्यासात हे आढळून आले आहे. हृदयरुग्णांचे वजन वाढल्यास त्यांच्या आरोग्याला धोका नसून शारीरिकदृष्टय़ा सक्रिय न राहणे हे धोकादायक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. वजन घटवणे हे आयुर्मानात वाढ होण्याशी संबंधित असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या अभ्यासात ३३०७ लोकांनी सहभाग घेतला होता. हृदयाच्या रक्तवाहिनीचा विकार असलेल्या ३३०७ रुग्णांची १९८५, १९९६ आणि २००७मध्ये तपासणी करण्यात आली होती. या ३० वर्षांच्या काळादरम्यान अभ्यासात सहभागी झालेल्या १४९३ लोकांचा मृत्यू झाला. यातील ५५ टक्के लोकांचा मृत्यू हा हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबधी रोगामुळे झाला. जे लोक शारीरिकदृष्टय़ा जास्त कार्यक्षम असतात त्यांचे आयुर्मान अधिक असल्याचे संशोधकांना आढळले. या वेळी काही प्रमाणात शारीरिकदृष्टय़ा सक्रिय, आवश्यकेतेपेक्षा कमी सक्रिय आणि शारीरिकदृष्टय़ा सक्रिय अशी अभ्यासात सहभागी झालेल्या रुग्णांची तीन गटांत विभागणी करण्यात आली. यामध्ये आठवडय़ातून १५० मिनिटांसाठी सक्रिय राहणे हे शारीरिकदृष्टय़ा सक्रिय राहण्याच्या गटात तर आठवडाभरात ६० मिनिटांच्या शारीरिक हालचाली काही प्रमाणात शारीरिकदृष्टय़ा सक्रिय राहण्याच्या गटात मोडत होते. जे लोक शारीरिकदृष्टय़ा निष्क्रिय होते. त्यांच्यामध्ये अकाली मृत्यूचा धोका अधिक असल्याचे आढळून आले. सतत शारीरिकदृष्या सक्रिय राहणे आवश्यक असून यामध्ये व्यतत्य आणल्यास आरोग्याला त्याचा पूर्ण फायदा मिळणार नाही, असे नार्वेजियन विद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान ट्रिन माहोल्ड यांनी सांगितले.