Benelli ने भारतात आपली बहुप्रतीक्षित बाइक Leoncino 500 लाँच केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तीन व्हेरिअंट्समध्ये (Standard, Trail आणि Sport) लाँच झालेली ही बाइक भारतात मात्र केवळ स्टँडर्ड व्हेरिअंटमध्येच लाँच करण्यात आली आहे. ‘स्क्रॅम्बलर स्टाइल’ असलेली Benelli Leoncino 500 स्टील ग्रे आणि रेड अशा दोन रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.

या बाइकच्या लाँचिंगवेळी, येत्या काही महिन्यांमध्ये भारतात अजून दोन-तीन बाइक लाँच करण्याची योजना असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. यात भारतीय बाजारासाठी खास डिझाइन केलेल्या 300cc क्षमतेच्या बाइकचाही समावेश असेल असंही कंपनीने स्पष्ट केलंय.

फीचर्स –  Benelli Leoncino 500 बाइकमध्ये 499.6cc, लिक्विड-कूल्ड, फ्युअल-इंजेक्टेड, ट्विन-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8,500rpm वर 47.6hp ची ऊर्जा आणि 5,000rpm वर 45Nm टॉर्क निर्माण करतं. बाइकच्या पुढील बाजूला 50mm USD फोर्क्स आणि मागील बाजूला मोनोशॉक सस्पेंशनचा वापर करण्यात आलाय. बाइकचे दोन्ही व्हिल्स 17-इंचाचे असून एबीएस फीचर आहे. ब्रेकिंगबाबत सांगायचं झाल्यास पुढील बाजूला 320mm ड्युअल-डिस्क आणि मागील बाजूला 260mm सिंगल डिस्क ब्रेक आहे.

किंमत –
या बाइकसाठी कंपनीने बुकिंग सुरू केली आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर 10 हजार रुपयांमध्ये बुकिंग करता येईल. बाइकच्या खरेदीवर कंपनीकडून 5 वर्ष/अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी आहे. किंमतीबाबत बोलायचं झाल्यास, ही बाइक कंपनीच्या टीआरके 502 बाइकपेक्षा 31 हजार रुपयांनी स्वस्त आहे. टीआरके 502 ची किंमत 5.10 लाख रुपये आहे. Benelli Leoncino 500 ची एक्स-शोरुम किंमत 4.79 लाख रुपये इतकी ठेवण्यात आलीये. किंमतीनुसार या बाइकची टक्कर कावासाकी झेड650 आणि सीएफमोटो 650 एनके या बाइकशी असेल.