जगातील २०० शहरे आणि १० मेट्रो सिटी डे झीरोच्या दिशेने वाटचाल करत असल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. यामध्ये भारतातील बंगळुरु शहराचा समावेश आहे. एकूण जगाच्या दृष्टीने ही बाब म्हणजे धोक्याची घंटा आहे. डे झिरो म्हणजे काय तर असा दिवस जेव्हा नळातून पाणी येणे बंद होईल. त्यावेळी मात्र लोकांचे जगणे खऱ्या अर्थाने अवघड होऊन जाईल. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्मेंटने प्रकाशित केलेल्या एका अहवालात ही गोष्ट नमूद करण्यात आली असून त्यातून पाण्याबाबतची भिषण स्थिती समोर आली आहे.

आज असणाऱ्या जागितक पाणी दिवसाच्या निमित्ताने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या गोष्टीनुसार, आफ्रिकेतील केपटाऊनसारखीच स्थिती काही दिवसांत भारतातील बंगळुरुची होऊ शकते. त्यामुळे काही महिन्यात याठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशी वेळ येऊ नये यासाठी शहर स्तरावर काही प्रयत्न होतीलही, पण त्याचा कितपत उपयोग होईल सांगता येत नाही. पाणी वाचविण्यासाठी शहरात पाणीकपात करण्याचीही शक्यता आहे.

बंगळुरुबरोबरच चीनमधील पेइचिंग, मक्सिको, येमेनमधील सना, केनियामधील नैरोबी, तुर्कीतील इस्तंबुल, ब्राझिनमधील साऊ पाऊलो, पाकिस्तानातील कराची, अफगाणिस्तानातील काबुल आणि अर्जेंटीनातील एका शहराचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात या शहरांना पाण्याची बचत करण्याची आणि इतर व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. या अहवालात म्हटल्याप्रमाणे २०५० पर्यंत जगातील ३६ टक्के शहरांमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. तेव्हा या शहरांतील पाण्याची मागणी आतापेक्षा ८० टक्क्यांनी वाढलेली असण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.