उत्तम आरोग्यासाठी सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट करणे अतिशय आवश्यक असते असे आपण नेहमी ऐकतो. आता सकाळी उठल्यावर आवरण्याची आणि शाळा, कॉलेज तसेच ऑफीसला जायची गडबड असते. मग कधी पटकन चहा बिस्कीट खाण्याचा तर कधी नुसते दूध पिऊन निघण्याचा मार्ग अनेक जण अवलंबतात. मात्र असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. सकाळचा नाष्ता हा न चुकता करायलाच हवा. आता सकाळी नेमके काय खाल्लेले चांगले याबाबतही आपल्याकडे अनेक समज-गैरसमज असतात. पण शरीराला उत्तम पोषण देणारे पदार्थ सकाळच्या पहिल्या खाण्यात असतील तर ते नक्कीच आरोग्यदायी ठरु शकते. पाहूयात ब्रेकफास्टला खायला पाहिजेत अशा काही खास पदार्थांची यादी…

अंडी

दोन मोठी अंडी तुम्हाला १३ ते १५ ग्रॅम प्रोटीन देतात. प्रोटीनबरोबर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अंडी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये व्हीटॅमिन बी आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, झिंक, आयर्न, कॉपर असते. तसेच अंड्यात स्निग्धता आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी असते. अंड्यात व्हीटॅमिन डीही मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये तुम्ही उक़डलेले अंडे, ऑम्लेट, बुरजी असे काहीही खाऊ शकता.

कडधान्ये

कडधान्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंटस असतात. कडधान्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असले तरीही त्यांचे अगदी सहज पचन होते. कडधान्यामुळे तुमचे पोट दिर्घकाळ भरलेले राहते, त्यामुळे तुम्ही मधल्या वेळात विनाकारण खात असलेल्या गोष्टी खाण्यावर नियंत्रण येते.

टोस्ट आणि पिनट बटर

पिनट बटर हे भारतीयांमध्ये प्रसिद्ध आहे. यामध्ये साखर आणि रिफाईंड व्हेजिटेबल ऑईलही असते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हे बटर तयार करुन वापरल्यास जास्त चांगले. भाजलेले दाणे पेस्ट होईपर्यंत बारीक करा. याला चव येण्यासाठी तुम्ही मीठ आणि मधही घालू शकता. दाण्यात हृदयासाठी उपयुक्त असणारे फॅटी अॅसिड असतात. २ टेबल स्पून पिनट बटर आणि होल विट टोस्ट खाल्ल्यास आपल्याला ७ ते १० ग्रॅम प्रोटीन मिळतात. हा अतिशय हेल्दी आणि प्रोटीन असलेला ब्रेकफास्ट असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ओटमिल

ब्रेकफास्टसाठी हा अतिशय उत्तम पदार्थ आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते त्यामुळे पोट दिर्घकाळासाठी भरलेले राहते. ओटमिलमुळे शरीरात हळूवारपणे कार्बोहायड्रेट सोडण्यास मदत होते. व्यायाम करण्याच्या तीन तास आधी ओटमिल खाल्ल्यास जास्त फॅटस बर्न होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील इन्शुलिनची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ब्रेकफास्टसाठी ओटमिल अतिशय उपयुक्त असते.