उत्तम शहरनियोजनामुळे नागरिकांचे आरोग्यही सुदृढ राहते असे संशोधन नुकतेच समोर आले आहे. भारत, चीन अशा जास्त लोकसंख्येच्या देशांमध्ये शहरांचे नियोजन जर चांगल्या पद्धतीने झाले तर वाढते आजारांचे प्रमाण आटोक्यात राहील असा या संशोधकांचा कयास आहे.

हे संशोधक म्हणतात की, शहरांचे नियोजन हे नागरिकांचे आरोग्य ध्यानात ठेवून झाले पाहिजे. दुकाने, इतर सुविधा, नोकरी व व्यवसायाचे ठिकाण, सार्वजनिक वाहतूक ही चालत पोहोचण्याच्या अंतरावर असावी. यामुळे वाहनांचा वापर कमी होऊन शरीराची हालचाल होते. सार्वजनिक वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण कमी होते आणि हवेच्या प्रदूषणाचा त्रासही कमी होतो.

अमेरिका, भारत, चीन या देशांमधील मोठय़ा शहरांतील प्रदूषणाचे प्रमाण अनुक्रमे ३३, ३८ आणि ९६ टक्के आहे. सार्वजनिक वाहतुकीपासून दूरवर असणाऱ्या घरांमुळे कमी शारीरिक हालचाल, वायुप्रदूषण, अपघातांमुळे मृत्यू तसेच मोठय़ा प्रमाणावर शारीरिक इजा होण्याची शक्यता असते. हे संशोधन प्रत्यक्षात येण्याकरिता प्रशासन, स्थानिक नेते, तज्ज्ञ, लोकांचा सहभाग आवश्यक आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)