बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होत असतो. सध्याची तरुणाई फास्ट फूडच्या आहारी गेली आहे. त्यामुळे त्यांच्या आहाराच्या पद्धतींमध्ये कमालीचा बदल झाल्याचं पाहायला मिळतं. परिणामी अनेकांना लठ्ठपणा ही समस्या निर्माण होते. मात्र लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत. डाएट करणे, जीमला जाणे यासारख्या गोष्टींच्या माध्यमातून आपण वजन कमी करु शकतो. मात्र जर एखादा व्यक्ती वजन कमी असण्याच्या समस्येने त्रस्त असेल तर त्यातून मार्ग काढणं कठीण होतं. अनेक उपाय करुनही काही जणांचं वजन वाढत नाही. त्यासाठीच इशा त्यागी यांनी वजन वाढविण्याचे काही उपाय सांगितले आहेत. करोनामुळे सर्वजण घरीच आहेत…त्यामुळे हे उपाय करून तुम्ही वजन वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या उपायांविषयी –

१. आहारात प्रोटीनचा समावेश –
वजन वाढविण्यासाठी आहारामध्ये कायम प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळत असतात. त्यामुळे दूध, पनीर या पदार्थांचा आहार समावेश करायला हवा. त्यासोबतच शेंगा आणि डाळींचाही आहार समावेश करावा.

२. कार्बोहायड्रेट्स –
ज्या पदार्थांमधून शरीराला कार्बोहायड्रेट मिळतात त्या पदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करावं. गहू, ब्राऊन राईस, धान्य यामधून शरीराला मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. त्यासोबतच ताजी फळं, बटाटे, सुकामेवा आणि आंबा यांच्यामुळेदेखील कार्बोहायड्रेट्स वाढण्यास मदत होते.

३. स्निग्ध पदार्थ-
ज्या पदार्थांमध्ये स्निग्ध पदार्थांचा अंश जास्त असतो अशा पदार्थांचा जेवणामध्ये हमखास वापर करावा. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. सूर्यफुलाचं तेल, एवोकाडो, मासे या पदार्थांमध्ये स्निग्धांश जास्त प्रमाणात असतात.त्यामुळे वजन लवकर वाढतं.

४. पोषक खाद्यपदार्थ –
स्टेक, चिकन, फळ, भाज्यान शेंगदाणे आणि पनीर या पदार्थांचा आपल्या आहारात नक्कीच समावेश व्हायला हवा. या पदार्थांचं सेवन केल्यामुळे वजन लवकर वाढतं. त्यामुळे रोजच्या आहारात संपूर्ण धान्य,पास्ता यांचा समावेश करावा.

५. सकस आहार –
फास्टफूड, जंक फूड खाण्यापेक्षा सकस आहारावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. नाश्तामध्ये एक ग्लास दूध, सफरचंद आणि मुठभर शेंगदाणे यांचा समावेश करावा आणि सोडा, स्मूदी यांसारख्या पदार्थांना आहारातून वगळावं.