टाकाऊपासून टिकाऊ आणि सुंदर काहीतरी निर्माण करता येऊ शकते याचा विसरच आपल्याला पडलाय नाही का? कोण ते कच-यापासून क्रिएटिव्ह काहीतरी बनवत बसणार. त्यापेक्षा दुकानात जाऊन चार पैसे जास्त मोजून तशीच एखादी वस्तू खरेदी करू अशी मानसिकता हळूहळू वाढू लागली आहे. पण अशा टाकाऊ वस्तूंपासून नवीन काहीतरी घडवण्याची मज्जा काही औरच असते. एक वेगळे समाधान या वस्तू बनवताना मनाला मिळते. तेव्हा कधीतरी नेहमीच्या कामातून ब्रेक घेऊन काहीतरी वेगळे करायला नको का?

या कुटुंबाचेच घ्या ना, गेल्या पाच वर्षांपासून बिअर बॉटल्सचे टोपण ते एकत्र करत होते. त्यांनी वेगवेगळ्या रंगांची जवळपास अडीच हजार टोपणं एकत्र केली. लाल, पिवळी, सफेद, हिरवी अशा नाना रंगाची टोपणं त्यांनी वेगवेगळी केली आणि यापासून आपले जेवणाचे टेबल सजवले. साडेचार तास मेहनत करून त्यांनी एका ओळीत ही टोपणं रचली. यातून जी कलाकृती निर्माण झाली ती अप्रतिम होती. एका टाकाऊ गोष्टीपासून अशीही सुंदर कला निर्माण करता येऊ शकते याचा आपण विचारही केला नसेल. पण कधीतरी याच निरुपयोगी वस्तू फेकण्यापेक्षा त्याचपासून अशीच एखादी भन्नाट वस्तू आपणही बनवू शकतो नाही का?