सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आपला चेहरा उजळ आणि तजेलदार ठेवण्यासाठी महिला, तरुणी कायम प्रयत्नशील असतात.त्यामुळे अनेक वेळा आपण कॉस्मेटिक्स आणि ब्युटीपार्लरचा आधार घेतो. मात्र चेहऱ्याच्या बाबतीत सतर्क असणाऱ्या तरुणी, महिला अनेक वेळा त्यांच्या ओठांच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ओठांवरील त्वचा निघणे, ओठ कोरडे होणे किंवा ओठांचा काळेपणा या समस्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी कोणत्याही कॉस्मेटिक्सचा वापर न करता घरगुती उपाय करुन आपण या समस्येवर मात करु शकतो. रुपम सिन्हा यांनी असेच काही घरगुती उपाय सांगितले आहेत.चला तर मग जाणून घेऊयात हे उपाय –

१. बदामाचं तेल –
बदामाच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषकतत्व असतात. त्यासोबतच त्यात ब्लिचिंग एजेंटदेखील असतात. या ब्लिचिंग एजेंटमुळे ओठांवरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. बदामाचं तेल हातावर घेऊन हलक्या हाताने ओठांवर या तेलाने मसाज करा. त्यानंतर हे तेल रात्रभर असंच ओठांवर राहू द्या. हा प्रयोग रोज केल्यानंतर त्याचा नक्कीच परिणाम दिसून येईल.

२. लिंबू आणि मध –
एक चमच्या लिंबाच्या रसामध्ये १-२ थेंब मध टाकावे हे मिश्रण एकजीव करुन दहा मिनीटे ओठांवर लावा. त्यानंतर गार पाण्याने ओठ पुसून घ्या. हा प्रयोग दिवसातून दोन वेळा करावा. लिंबू आणि मधामध्ये अॅटीसेप्टीक गुण आणि ब्लिचिंग एजेंट असतं. त्यामुळे मध लिंबाचा लेप ओठांवर लावल्यास ओठांमध्ये आद्रता टिकून राहते. त्यासोबतच ओठांवरील काळेपणा दूर होतो.

३. शुगर स्क्रब –
१चमचा साखरेमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकावेत. त्यानंतर या मिश्रणाने ३ ते ४ मिनीटे ओठांवर स्क्रब करावं. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा प्रयोग करावा. या लेपामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते. स्क्रब आपल्या ओठांना एक्सफोलिएट करतं.

४. काकडीचा रस-
काकडीचा बहुविध उपयोग असून अनेक वेळा त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी काकडीचा वापर केला जातो. काकडीमुळे चेहऱ्याला तजेला मिळतो. त्याप्रमाणेच ओठांसाठीदेखील काकडी तितकीच महत्वाची आहे. काकडीचा रस काढून तो १० ते १५ मिनीटे ओठांवर लावून ठेवा. त्यानंतर गार पाण्याने ओठ धुवावेत. हा प्रयोग दिवसातून २ वेळा करावा. काकडीमध्ये ब्लिचिंग आणि हायड्रेटिंगची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे ओठांवरील काळेपणा दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यासोबतच ओठांवरील आद्रताही कायम राहते.