बील गेट्स हे नाव ठाऊक नसाणारी व्यक्ती शोधून सापडणे तसे कठीणच आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक आणि अनेक वर्ष मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष असणारे बील गेट्स हे तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात यशस्वी व्यक्तीमत्व आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे बिरुद मिरवणाऱ्या बिल गेट्स यांनी नुकतीच एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकीबद्दलचा खुलासा केला.

‘व्हिजेल ग्लोबल’ गेट्स या व्हेंचर कॅपिटल फर्मने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये बिल गेट्स यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांना नवीन कंपनीची स्थापना करणे आणि ती कंपनी स्पर्धात्मक बाजारामध्ये टिकून रहावी यासाटी कोणते कठोर निर्णय घ्यावे लागतात यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. कार्यालयीन आणि खासगी जीवनाचा समतोल तुम्ही कसा साधत यासंदर्भात त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘कंपनीची स्थापना केल्यानंतर पहिले काही वर्षे सुट्टी घेण्यावर माझा विश्वास नव्हताच’ असं गीट्स यांनी सांगितलं. मात्र कंपनीची व्यवस्था बसल्यानंतर गेट्स विकेण्डला स्वत:च्या मुलीबरोबर वेळ घालवायचे. कंपनी सुरु केल्यानंतरचा काळ सर्वात महत्वाचा असतो असंही गेट्स यांनी सांगितले. ‘कंपनी सुरु केल्यानंतर पहिल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींना मुकावे लागते या विचाराचा मी आहे. त्यातही तुम्ही इंजिनियरिंग आणि त्याची खऱ्या आयुष्यातील व्यवहार्यतेवर काम करत असाल तर तुम्हाला अधिक कष्ट घ्यावे लागतात,’ असं मत गेट्स यांनी व्यक्त केले.

इतकं झोकून काम केल्यानंतरही अनेकदा चुका होतात असं सांगताना गेट्स यांनी, ‘कंपनीची स्थापना केल्यानंतर सतत कामात व्यस्त राहिल्यानंतरही अनेकदा असे काही निर्णय घेतले ज्यामुळे कंपनीला फटका बसतो’ असं म्हटलं आहे. आपणही अशीच एक चुक केल्याची खंत यावेळी गेट्स यांनी बोलून दाखवली. गुगलला कोणत्याही स्पर्धेशिवाय अॅण्ड्रॉइड सारखी प्रणाली डेव्हलप करु दिली ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरल्याचे गेट्स यावेळी म्हणाले. ‘सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये त्यातही खास करुन प्लॅटफॉर्म निर्मितीच्या क्षेत्रात केवळ विजेताच बाजारपेठेवर सत्ता गाजवतो. त्यामुळेच माझी सर्वात मोठी चूक म्हणजे मी कंपनीची घडी बसवल्यानंतर आज अॅण्ड्रॉइड जे काही आहे तशापद्धतीने मायक्रोसॉफ्टला डेव्हलप करु शकलो नाही. आज नॉन अॅपल फोन्ससाठी अॅण्ड्रॉइड हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे,’ असं गेट्स म्हणाले.

२००७ साली जेव्हा अॅपलने आयफोन बाजारात आणला तेव्हा मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष स्टीव्ह ब्लमर यांनी त्याच्याकडे दूर्लक्ष केले. आयफोनला किबोर्ड नसल्याने काचेवर टायपिंग करायला लागणारा हा फोन युझर्सला आवडणार नाही असा अंदाज मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. ‘आमचे धोरण वेगळे असून आमच्याकडे विंडोजचे चांगले मोबाइल आहेत,’ असं त्यावेळी ब्लमर म्हणाले होते.

गुगलने २००५ साली अॅण्ड्रॉइड बाजारात आणले. सुरुवातील अॅण्ड्रॉइड केवळ डिजिटल कॅमेरांसाठी वापरण्याच्या उद्देशाने बाजारात आणले होते. एकीकडे मायक्रोसॉफ्टने आयफोनची खिल्ली उडवत त्याकडे दूर्लक्ष केले तर दुसरीकडे अॅण्डी रुबिन्सच्या नेतृत्वाखाली गुगलने अॅण्ड्रॉइडमध्ये अनेक महत्वाचे बदल केले. या बदलांमुळे अॅण्ड्रॉइड टचस्क्रीन फोन्ससाठी वापरण्यास सुरुवात झाली.

अखेर तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन कंपन्यांनी एवढे मोठे बदल केल्यानंतर २०१० साली मायक्रोसॉफ्टने पहिला टचस्क्रीन फोन बाजारात आणला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्या फोनची ऑप्रेटिंग सिस्टीम चांगली असूनही संपूर्ण बाजारात अॅण्ड्रॉइडचीच चर्चा असल्याने मायक्रोसॉफ्टने मोठी बाजारपेठ गामावली होती. मागील अनेक वर्षांपासून असंख्य डेव्हलपर्स आयओएस आणि अॅण्ड्रॉइडसाठी अॅप्लिकेशनची निर्मिती करतात. त्यामुळेच अॅपलबरोबरच अॅण्ड्रॉइडसारख्या माध्यमांवर अॅप्लिकेशन निर्मिती सहज शक्य असल्याने कोणालाही तिसऱ्या ऑप्रेटिंग सिस्टीमवर (मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कोणतेही) अॅप्लिकेशन निर्मिती करावीशी वाटली नाही.

‘अॅप्लिकेशनच्या क्षेत्रामधील ९० टक्के भागात तुमचेच वर्चस्व असेल तर संपूर्ण बाजारपेठच तुमची आहे. या श्रेत्रात अॅपल शिवाय केवळ एकाच ऑप्रेटिंग सिस्टीमला जागा आहे. आणि आज त्याची किंमत चाळीस हजार कोटी डॉलर इतकी आहे. हीच बाजारपेठ जी ऐवजी एम कंपनीची असती,’ असं गेट्स म्हणाले. गेट्स यांना या चुकीचा इतका पश्चाताप होत आहे की त्यांनी अॅण्ड्रॉइड संदर्भातील आपले उत्तर संपवताना गुगलचे नाव घेणेही टाळले. ‘तो एक निर्णय आम्ही योग्य घेतला असता तर आज आम्ही सॉफ्टवेअरबरोबरच मोबाइल ऑप्रेटिंग निर्मिती श्रेत्रातील सर्वात मोठी कंपनी असतो,’ असंही गेट्स म्हणाले.

आज जगभरात वापरल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये सर्वाधिक स्मार्टफोन्स हे अॅण्ड्रॉइडवर चालतात. त्या खालोखाल आयओएसचा क्रमांक लागतो आणि याच बाजारपेठेतील अगदीच अल्पसा हिस्सा मायक्रोसॉफ्टचा आहे.