सध्या जगात करोना विरोधात निकराची लढाई सुरू आहे. त्यात जास्तीत जास्त व्यक्तींच्या चाचणीलाही महत्त्व असताना ही चाचणी घरच्या घरीच करता येईल असा तपासणी संच बंगळुरुच्या ‘Bione’ या सूक्ष्मजीव तपासणी करणाऱ्या संस्थेने तयार केला आहे. ‘Bione’ ने ‘रॅपिड COVID 19’ हा संच जारी केला असून हे भारतातील पहिले होम स्क्रीनिंग टेस्ट किट असल्याचा दावा केलाय. तज्ज्ञांच्या मते हा संच वापरण्यास अगदी सोपा असून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची चाचणी करणे शक्य आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही(आयसीएमआर) या संचाला मान्यता दिली आहे.

हे किट वापरायला अगदी सोपे असून काही मिनिटातच आजाराचे निदान होते. या प्राणघातक विषाणूची वेळेतच तपासणी करण्यात हे किट प्रभावी भूमिका बजावेल अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केलीये. आयसीएमआरकडून या किटला परवानगी मिळाली असून योग्य गुणवत्ता तपासणी आणि आश्वासन मिळाल्यानंतर ते बाजारात उतरवले जातील. यात अचूक निष्कर्ष मिळतात व त्यासाठी काही मिनिटेच वेळ लागतो. ही चाचणी या संचाच्या मदतीने करण्यासाठी तुमचे एक बोट अल्कोहोलने स्वच्छ करा , नंतर बोट टोचणी यंत्राने टोचून रक्त काढून त्याचा नमुना घ्या. त्यानंतर संचातील एका काट्रिजमध्ये हा नमुना सोडा, लगेच त्यावर ५ ते १० मिनिटात तुम्ही करोनाबाधित आहात की नाही हे दिसेल. या संचाची किंमत २ ते ३ हजार रुपये असून जागतिक मागणी वाढल्यास तो आरोग्य सेवा कंपन्यांना कमी दरात देता येईल. कोव्हिड-१९ स्क्रीनिंग टेस्ट किट हे एक आयजीजी व आयजीएमवर आधारित साधन असल्याने निदान करण्यासाठी हे ५ ते १० मिनिटे घेते. सामान्य स्थिती राहिल्यास कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर ऑर्डर दिल्यास हे किट २ ते ३ दिवसात उपलब्ध होईल. दर आठवड्यात २० हजार किट पुरवण्यास कंपनी सज्ज आहे.

याबाबत बोलताना बायोनचे सीईओ डॉ. सुरेंद्र चिकारा म्हणाले, ‘‘आजच्या अभूतपूर्व परिस्थितीत कोव्हिड-१९ होम स्क्रीनिंगट टेस्ट किट हे एक यशस्वी उत्पादन म्हणून उदयास आले आहे. निदानाचा वेळ कमी करून आम्ही भारताचे कोरोनासोबत सुरू असलेल्या युद्धात मदत करत आहोत. कोरोना व्हायरसविरुद्ध क्रांती करण्यास सरकार आम्हाला पाठिंबा देईल, असा आम्हाला विश्वास आहे.”