निनाद परुळेकर

महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नाशिकच्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात जाण्याचा योग एक-दोन वर्षांपूर्वी आला होता. त्या वेळी ते पक्षीतीर्थ चांगल्याप्रकारे पाहता आले आणि तेथे मुक्कामाला आलेल्या विविध जातींच्या हजारो पक्ष्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. गोदावरी नदीवर बांधल्या गेलेल्या धरणाच्या जलाशयावर मस्त विहार करणारी विविध जातींची रंगीबेरंगी बदके, त्यापलीकडील डाव्या बाजूला असलेल्या पाणथळीत चोचींनी आणि पायांनी दलदलीतला टिटव्या (लेपविंग्ज्), तुतवार (सॅण्डपायपर्स), पिवळे व कृष्णधवल परीट पक्षी (यलो आणि पाईड वॅगटेल), तसेच वेडीवाकडी चमत्कारिक उड्डाणे करून तारेवर विसावा घेणाऱ्या पाकोळ्या (स्वेंलोज) आपापले खाद्य खाण्यात मग्न होते. यांच्यासोबतच सीगल्स (कुरव), टर्न (सूरटा), विविध जातींचे बगळे, करकोचे आदी पक्षी मंडळीही होती.

हे सगळेच आपले पाहुणे! दूरदेशीहून हजारो मैलांचा प्रवास करून येथे आलेली ही मंडळी. उत्तर गोलार्धातील अत्यंत कडाक्याची थंडी, बर्फाच्या थरांमुळे गोठलेली खाद्यउपलब्धता त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीस दक्षिण गोलार्धाकडे कूच करणारे हे पक्षी हिवाळ्यात हमखास आपल्याकडे दिसतात. भारतीय उपखंडापुरते बोलायचे झाल्यास, पावसाळा संपून हिवाळ्याचा मोसम आला असल्याने धान्य-पाण्याची चणचण नसते. वातावरणही उबदार असते. अशी अनुकूल संधी हे भटके प्रवासी सोडतील बरे? आयत्या तयार झालेल्या धान्याच्या कणसांवर ताव मारायला भरपूर कीटक अगदी थव्याने येतात आणि त्या थव्यांवर ताव मारायला हे पक्षी! अशी ही भक्ष्य आणि भक्षक यांची साखळी आपल्याला पाहायला मिळते.

स्थलांतराच्या आधी..

पक्ष्यांचे हे स्थलांतर हजारो वर्षांपासूनच सुरू आहे. हिवाळ्यात हे पक्षी उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात येतात आणि उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर ते परत उत्तर गोलार्धात जातात. पण हे इतके सहज नाही. त्यासाठी हजारो मैलांचा प्रवास हे पक्षी करत असतात. अनेकदा वाटेत मैलोन्मैल समुद्र असल्याने वाटेत खाद्य मिळणेही कठीण. पण या पक्ष्यांनी आधीच त्याची पूर्वतयारी केलेली असते. उत्तर सैबेरिया, उत्तर युरोप, वगैरे भागांतून दक्षिणेकडे येण्याआधी हे पक्षी खूप खाद्य खाऊन शरीराची चरबी वाढवतात. ही चरबी पुढच्या थकवणाऱ्या प्रवासात त्यांना ऊर्जा देते.

बदकांचा वेगवान प्रवास

या स्थलांतरित पक्ष्यांतले विशेष कुतूहल म्हणजे बदके. सारा संसार पाण्यात असणाऱ्या रंगीबेरंगी व साध्याभोळ्या दिसणाऱ्या बदल मंडळींचा आकाशातील संचाराचा वेग कल्पनातीत असतो. त्यांचे पाण्यातील ‘ध्यान’ बघून त्यांना उडायला तरी येईल का अशी शंका मनात येते. पण प्रत्यक्ष उड्डाण मात्र जबरदस्त आणि वेगवान असते. या बदकांमध्ये लालसर शेंदरी मान असलेले डॅबचिक, पाठीवर हिरवा रंग असलेले व मानेवर काळसर हिरवट रंगाचे कडे असलेले कॉटन हिल, स्पॉटबील, काळा-पांढरा रंग असलेली स्काऊस डक अशी अनेक जातींची बदके येथे येतात आणि ती सुमारे पाच हजार किलोमीटर्स अंतर पार करून येथे स्थिरावतात. जसा वसंत ऋतूला प्रारंभ होईल त्या वेळी ती तेवढेच अंतर पार करून जाणार असतात. बदके एका तासात ६० ते ६५ किलोमीटर्स वेगाने उडतात. २४ तासांच्या एकूण दिनमानात ती जवळजवळ सात ते अकरा तास उडत असतात. आक्र्टिक टर्न हा पक्षी अकरा तासांत आठशे किलोमीटर्स उडून दक्षिण ध्रुवावर जातो व परत मूळ ठिकाणी पोहोचून एकूण साडेतीन हजार किमी अंतर कापतो. जपानमध्ये आढळणारे पाणलाव (स्नाईप) हे पक्षी जपानहून पूर्व ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया येथे जातात. या दोन देशांतील अंतर सुमारे साडेचार हजार किमी आहे आणि हे अंतर वरील पक्षी एका उड्डाणात पार करतात.

चिखल्या (Plover) जातीचे पक्षी, ज्यांचे वसतिस्थान अलास्का आणि उत्तर सैबेरिया हे आहे, ते एकाच उड्डाणात हवाई द्वीपात पोहोचतात. वरील दोन्ही ठिकाणे हे हवाईद्वीप यातील अंतर पावणेचार हजार किमी आहे. अर्थात हा त्यांचा ‘सामान्य वेग’ आहे. हे पक्षी जमिनीच्या किंवा सागरी पृष्ठभागाच्या ९०० ते १००० मीटर (सुमारे ३००० फूट) उंचीवरून सामान्यत: प्रवास करतात. काही मोठे पक्षी दिवसाही प्रवास करतात, पण बहुसंख्य पक्षी हे सूर्यास्तानंतर रात्रीचा प्रवास करतात, कारण शिकारी पक्ष्यांपासूनचे भय रात्री नसते. फ्लेमिंगो (रोहित), स्टॉर्क्‍स (करकोचे) हे पक्षी थव्याथव्याने आणि इंग्रजी ‘व्ही’ अक्षरासारखा आकार करून वेगाने उडत जातात. यामध्ये या पक्ष्यांचा म्होरक्या सर्वात पुढे असतो आणि त्यांच्या डाव्या-उजव्या बाजूला काही फैलावलेल्या आकारात ते उड्डाण करतात. अशा विशिष्ट कोनाच्या आकारात केलेल्या उड्डाणामुळे हवा जोशात कापली जाते आणि उड्डाणाला किमान शक्ती खर्च करावी लागते.

पक्ष्यांची ही सारी स्थलांतरे निसर्गाच्या ‘आज्ञेवरून’च होत असतात. ‘चोच आणि पोट देणाऱ्याच्या चाऱ्याचीही सोय देवबाप्पा करून ठेवतो’ असे म्हटले जाते. त्याप्रमाणे जेथे फुले, फळे यांची वृक्षराजी बहरणार आहे अशा वसंत ऋतूत त्या त्या ठिकाणी मुक्कामाला जाण्याची अनाकलनीय संवेदना आपोआपच या पक्ष्यांत होते आणि त्या ऋतूत फळाफुलांना आलेल्या बहराचा समाचार घ्यायला पक्ष्यांचे प्रजोत्पादन – नव्या पिलांना जन्म आणि बहरातले खाद्य आपोआपच त्या पिलांना मिळू शकण्याची निसर्गाची किमया..

प्रवासातील संकटे

असा प्रवास करताना या पक्ष्यांवर संकटेही तेवढीच येतात. कधी अचानक हवा बदलून तुफान येते तर कधी कडाक्याच्या थंडीमुळे सर्व आसमंतात धुके पसरते व पुढचे काही दिसेनासे होते. तसेच कधी आभाळ ढगांनी भरले असता सूर्यदर्शन होत नाही आणि पक्ष्यांचा गोंधळ उडून त्यांना योग्य दिशा सापडत नाही आणि मार्ग चुकतो. कधी अचानक बर्फ पडूनही त्या भडिमाराखाली पक्षी मरतात. दिवसा प्रवास करणाऱ्या पक्ष्यांना ससाणे किंवा इतर शिकारी पक्ष्यांकडून फस्त होण्याचा धोका असतो. तर कधी रात्रीच्या वेळी प्रवासी पक्षी दीपगृह, बोटींचे प्रखर दिवे यामुळे दिपून जाऊन गोंधळतात व समुद्रात आदळतात.

Email : pneenad@gmail.com