आजकाल चेहऱ्यावर वांग अथवा काळे डाग बऱ्याच लोकांना झाल्याचे पाहायला मिळतात. वांग ला वैद्यकीय भाषेत मेलास्मा किंवा क्लोआस्मा असं म्हणतात. वांगला दुसरं नाव आहे मास्क ऑफ प्रेग्ननसी. नावावरून लक्षात आलंच असेल की सर्वसाधारण वांगचे काळे डाग पहिल्यांदा गर्भवती स्त्रियांमध्ये दिसतात. पण हल्ली वांग हा प्रकार एका विशिष्ट वयात सीमित किंवा गर्भवती स्त्रियांमध्ये सीमित नाही राहिला. शिवाय गरोदर स्त्रियांमध्ये हा त्रास होतो म्हंटल्यावर असं वाटतं की हा आजार स्त्रियांमध्येच दिसतो. पण तसं नसून हा आजार पुरुषांमध्ये सुद्धा दिसतो. जर वयोगट बघितलं तर हा आजार २५ ते ६० पर्यंत कोणत्याही वयात, स्त्रियांना व पुरुषांना दोघांना ही होऊ शकतो. गाल आणि नाकावरील काळे डाग हा वांग असू शकतो. तेव्हा आधी हे वांग आहे का याची डॉक्टरांकडून खात्री करून घेऊनच उपचार सुरू करणे योग्य आहे.

प्रखर उन्हामुळे हे डाग अधिक काळे दिसतात. त्यामुळे असे डाग आलेल्या व्यक्तीने नेहमी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावूनच उन्हात जावे. ३० ते ५० एसपीएफ असलेले सनस्क्रीन सकाळी आणि दुपारी न चुकता लावावे.

चेहऱ्यावरील वांग व काळपटपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस, लिंबुरस व दूध एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावावे व हलक्या हाताने मसाज करावा

चेहऱ्यावर काळे वांग आले असतील किंवा ओठ काळे दिसत असतील तर दुधाच्या सायीमध्ये बदाम उगाळून हळुवार मालीश करावी. यामुळे काळसरपणा दूर होतो.

हल्ली बाजारात पावडर देखील मिळते ती माती फेसपॅकसारखी चेहऱ्यावर लावता येते. या मातीत असणाऱ्या घटकामुळे त्वचेवरील पुटकुळ्यामुळे पडलेले डाग तसेच वांग कमी होण्यास मदत होते.

त्वचारोग विशेषतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे आणि मलमचा वापर केल्यास हे डाग कमी होतात.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांच्या दुकानातून फार्मासिस्टकडून घेऊन मलमचा वापर करू नये. अशा रीतीने स्टिरॉईडयुक्त मलमचा वापर केल्यास त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता अधिक असते.

डागांसाठी टी ट्रेल ऑइल, कोजीक अ‍ॅसिडयुक्त मलमचा वापर केल्यास डाग कमी होण्यास मदत होते.

केमिकल पील आणि मायक्रोड्रम अब्रेशॅन या प्रक्रियांनी डाग फिकट होण्याची शक्यता असते.

वांग कमी करण्यासाठी आता इंजेक्शनच्या रूपात नवीन उपचार उपलब्ध आहेत.

मलमच्या वापराने सुधारणा होत नसल्यास क्यू स्विच एनडी यॅग या लेसर पद्धतीचा वापर करून डाग घालवणे शक्य आहे.

उपचारांनंतर सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक असते. असे न केल्यास डाग पुन्हा काळे होण्याची शक्यता असते.