20 November 2019

News Flash

ठिणगी ठिणगीचे लोहारकाम

शक्ती व युक्तीच्या आधारावर लोहार आपली कला व आपला व्यवसाय जोपासत असतात.

उरण - कोटनाकाच्या रस्त्याला लागून एक झोपडीवजा घर आणि त्या समोरच लोहार कुटुंबाचा ऐरण हे दैवत आहे.

वाचक लेखक
प्राजक्ता म्हात्रे – response.lokprabha@expressindia.com

‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे,
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’

या लोकप्रिय गाण्याची आर्तता मला खऱ्या अर्थाने कळली ती उरणमधील लोहारदादांची भेट घेतल्यावरच. ऑफिसला जाण्याच्या वाटेवरच मला बरेचदा हे लोहारकाम दृष्टीस पडायचे त्यामुळे त्याबद्दलच्या उत्सुकतेपोटी मी लोहार परिवाराची भेट घेतली.

उरण – कोटनाकाच्या रस्त्याला लागून एक झोपडीवजा घर आणि त्या समोरच लोहार कुटुंबाचा ऐरण हे दैवत आहे. प्रकाश सोळंकी, त्यांची पत्नी मीरा आणि त्यांची तीन मुले असं हे कुटुंब. लोहारकाम हा या कुटुंबाच्या उपजीविकेचा एकमेव व्यवसाय. पिढीजात लोहारकाम हा धंदा असल्याने जन्मापासूनच प्रकाश यांची लोहारकामाची ओळख. आपल्या मूळ गावी धंद्याला जोर नाही, उदरनिर्वाह होत नाही म्हणून परभरणीहून येऊन या कुटुंबाने उरण शहरात बस्तान मांडलं. इथे मेहनत करून हे कुटुंब आपलं पोट भरतं आणि मुलांना शिक्षण देतं.

तळपत्या ज्वाळेच्या सान्निध्यात लोखंडाला आकार देण्याची, लोखंडाचे हत्यार बनविण्याची  कला. शक्ती व युक्तीच्या आधारावर लोहार आपली कला व आपला व्यवसाय जोपासत असतात. ऐरण, कोळसा, भाता, लोखंड आणि हत्यारे यांच्या साहाय्याने लोहार हत्यारे बनवितात. लोहारकामासाठी अग्निदेवतेला  ज्वलंत राहण्यासाठी भाता लागतो. हा भाता चामडं तसंच सागाच्या मजबूत फळ्यांनी बनविलेला असतो. भात्याची साखळी खाली-वर करताना भात्याची फुंकर मिळालेले कोळसे लाल भडक होतात आणि ज्वाळा झळाळू लागते.

ऐरण म्हणजे भक्कम लोखंडाचा चौकोनी तुकडा. तो बसवण्यासाठी भक्कम लाकूड लागते. कारण या ऐरणीला जोरदार घाव सोसण्यास तेवढाच भक्कम आधार हवा असतो. त्यासाठी बाभळीचे मजबूत लाकूड वापरले जाते.

जाळ करण्यासाठी आणलेले मोठय़ा आकारातले दगडी कोळसे बाजारात मिळतात. त्याचे तुकडे करून ते वापरावे लागतात. इथून सुरुवात होते ती घाव मारण्याची. ती हत्यार किंवा वस्तू तयार होईपर्यंत सुरू असते.

लोहार भंगारवाल्याकडून लोखंड घेतात. त्यांच्याकडे मिळणाऱ्या गाडय़ांच्या भागांपासून कोयता, खरळ, विळी, मोठे सुरे बनवता येतात. इतर वस्तू जसे की पारई, कुऱ्हाड आणि शेतीची काही अवजारे बनविण्यासाठी लोहार लोखंड विकत आणतात. खरळ, कोयत्याला लागणाऱ्या मुठी कर्जतच्या डोंगरातून आदिवासी लोकांकडून आणाव्या लागतात किंवा ते आदिवासी यांच्याकडे विकायला येतात. या मुठीही कडक असणे अपेक्षित असते. त्यासाठी पेरू, करंज अशा झाडांच्या फांद्या लागतात. मुठीसाठी लाकडे तासून तासून ती कोयत्यात, खरळात बसवावी लागतात.

शस्त्राच्या साहाय्याने घाव घालून लोहार लोखंडाचे तुकडे करतात. भात्याच्या साहाय्याने कोळशापासून ज्वाळा बनवून या लोखंडाला त्यावर तापवून हवा तो आकार दिला जातो. हा आकार लोखंड नुसते तापवून येत नाही तर ऐरणीवर ते तुकडे ठेवून पूर्ण ताकद लावून ते ठोकून ठोकून त्याला हत्याराचा आकार द्यावा लागतो. शेवटी कानसने धारही करावी लागते. हे करत असताना आगीची धग सोसावी लागते, धुरामुळे होणारा कोंडमाराही सहन करावा लागतो. अनेकदा ठिणग्या उडून अंगावर येतात. भाजल्या जागी फोड येतात. कपडय़ांना छिद्रे पडतात. उन्हाळा असेल तर झळा जास्तच लागून अंगाची आग आग होते. घावावर घाव घालण्याने खूप अंगमेहनत होते ती तर वेगळीच. घाव चुकले की ते हाता-पायावर बसून अपघात घडतात. हे काम संध्याकाळी सहापर्यंतच करावे लागते. कारण त्यानंतर अंधारात नीट काम करता येत नाही व झोपडीत उजेडही मर्यादितच असतो. दिवसाचे साधारण ५०० रुपये सुटतात. त्यातच या कुटुंबांना आपला खर्च भागवावा लागतो. त्यामुळे कधी आजारी पडलं तरी काम करत राहण्याशिवाय गत्यंतर नसते.

सर्व हत्यारांची व ऐरणीची दसऱ्याला मनोभावे पूजा केली जाते. पण या दिवशीही ते काम बंद ठेवत नाहीत, कारण कुटुंबाच्या पोटापाण्याचा  सवाल असतो.

लोहारदादांची पत्नी गावोगावी जाऊन हत्यारे विकून आपल्या संसाराला हातभार लावते. जागेवरही लोक हत्यारे बनवून नेतात वा ऑर्डर देतात. पण आता पूर्वीसारखी शेती न राहिल्याने फार कमी मागणी असते. शिवाय खाडय़ा, समुद्रात पडलेल्या भरावांमुळे मासेमारीही आटोक्यात आली आहे. परिणामी कोयता, कातीसारख्या हत्यारांची मागणीही कमी झाली आहे. तरी उरणमध्ये काही प्रमाणात असलेल्या शेतीमुळे आणि करंजा, मोरा बंदरांवर चालणाऱ्या मासेमारीच्या व्यवसायामुळे उरण शहरात लोहारकाम टिकून आहे. जे मिळतं त्यात उपासमार होत नाही इतकंच काय ते या कुटुंबाचं समाधान आहे. मात्र मुलांनी आपल्यासारख्या खस्ता खाऊ नयेत, शिकून चांगल्या नोकऱ्या किंवा व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलांनाही या कामाबद्दल फार आस्था नाही.
सौजन्य – लोकप्रभा

First Published on July 22, 2019 6:24 pm

Web Title: blacksmith and his family hard work
Just Now!
X