हृदयरोगाची जोखीमही कमी होत असल्याचा दावा

निळ्या प्रकाशाच्या संपर्कात आल्याने रक्तदाब कमी होऊन हृदयविकार जडण्याचा धोका कमी होतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. ‘युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेन्टिव्ह कार्डिओलॉजी’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या प्रयोगात सहभागी झालेल्यांच्या संपूर्ण शरीरावर ४५० नॅनोमीटरचा निळा प्रकाश ३० मिनिटे सोडण्यात आला. प्रकाशाची ही मात्रा तुलनेत दिवसभर मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाइतकी आहे. त्याआधी एके दिवशी त्यांना नियंत्रित प्रकाशात ठेवले होते.

दोन्ही प्रकारच्या प्रकाशांत ठेवण्याआधी, या प्रकाशात असताना आणि त्यानंतरच्या दोन तासांपर्यंत या व्यक्तींचा रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे काठिण्य, त्यांची प्रसारणक्षमता आणि रक्तघटकांमधील नायट्रिक ऑक्साइडची पातळी यांची मोजणी करण्यात आली. अतिनिल किरणे (अल्ट्राव्हायोलेट लाईट) ही कर्करोगास कारणीभूत ठरत असली तरी, डोळ्यांना दिसणाऱ्या निळ्या प्रकाशापासून हा धोका नसतो.

इंग्लंडमधील सुरे विद्यापीठ आणि जर्मनीतील हेन्रिच हेन विद्यापीठ, डय़ुसेलडार्फच्या संशोधकांनी या अभ्यासानंतर आपले निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यानुसार, संपूर्ण शरीरावर निळा प्रकाश सोडल्यानंतर त्या व्यक्तीचा रक्तदाब आठ एमएमएचजी (मिलिमीटर ऑफ मक्र्युरी)इतका लक्षणीयरीत्या कमी झाला. परंतु, तुलनेत नियंत्रित प्रकाशात हा परिणाम दिसून आला नाही.

निळ्या प्रकाशामुळे कमी झालेला रक्तदाब हा वैद्यकीय चाचण्यांत रक्तदाब कमी करणारी औषधे दिल्यानंतर घटलेल्या रक्तदाबासारखाच होता. इतकेच नव्हे तर, निळ्या प्रकाशामुळे हृदयाच्या धमन्यांत दोष दाखवणारी अन्य लक्षणेही कमी झाली. जसे की, रोहिण्यांची कडकपणा कमी होऊन नीलांची प्रसारणक्षमता वाढली.  ज्यांचा रक्तदाब औषधांनी नियंत्रणात येत नाही (उदाहरणार्थ वयोवृद्ध), त्यांच्यावरील उपचारांसाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार असल्याचा दावा सुरे विद्यापीठाचे प्रो. क्रिश्चन हेस यांनी केला आहे.