मधुमेह टाइप २वर प्रभावी उपचारासाठी गोळ्यांचा अधिक प्रभावी वापर करून त्यात शस्त्रक्रियेइतका मोठा परिणाम साध्य करणे शक्य आहे, असे नवीन संशोधनातून दिसून येत आहे. ‘नेचर मटेरियल्स’ या नियततकालिकात संशोधकांनी म्हटले आहे, की उंदरांना तोंडावाटे एक गोळी देऊन बराच परिणाम साध्य झाला आहे. या प्रयोगात गोळीतून एक असा पदार्थ देण्यात आला की, जेवणानंतर आतडय़ात येणाऱ्या पोषकांचा संपर्क हा आतडय़ाच्या विशिष्ट स्तराशी येऊ दिला नाही, त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचे प्रमाण कमी झाले. थोडक्यात, ही विशिष्ट गोळी जेवणाआधी घेतली तर त्यात आतडय़ाच्या शस्त्रक्रियेइतके फायदे मिळतात, असे ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलचे जेफ कार्प यांचे म्हणणे आहे. शस्त्रक्रियेसारखा परिणाम करील असा पदार्थ शोधण्याचे प्रयत्न गेली काही वर्षे या वैज्ञानिकांनी केले आहेत. गेल्या दशकात बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया करणाऱ्या शल्यविशारदांनी वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्याचे तंत्र मिळवले, पण त्यामुळे  केवळ जाडी कमी होण्यास मदत झाली.

मधुमेह २ मात्र अशा शस्त्रक्रियेनंतर पुन्हा होऊ शकतो. शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांचे जीवन सुसह्य़ झाले हे खरे असले तरी अशी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या रूग्णांचे प्रमाण कमी आहे. गोळीतून शस्त्रक्रियेचे परिणाम साधण्यासाठी ‘सुक्राफेट’ हा पदार्थ निवडण्यात आला. अमेरिकेत हे मान्यताप्राप्त औषध असून ते आतडय़ाच्या अल्सर वर वापरले जाते. हा पदार्थ पोटात गेल्यानंतर आतडय़ाला एक विशिष्ट थर बसतो, त्यामुळे गॅस्ट्रिक अ‍ॅसिडच्या निर्मितीची गरज राहत नाही. ल्युमिनल कोटिंग ऑफ इंटेस्टाइन हे पावडरीच्या स्वरूपातील संयुग गोळीमार्फत दिले जाते, त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर वाढत नाही. उंदरांमध्ये या प्रयोगाने एका तासात ग्लुकोज ४७ टक्क कमी झालेले दिसून आले.