जर्मनीची दिग्गज कारनिर्माती कंपनी बीएमडब्ल्यूने आज (मंगळवारी) 10 लाखांहून जास्त कार परत मागवल्या आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही कंपनीने 4 लाख 80 हजार कार परत मागवल्या होत्या. अशाप्रकारे जगभरातून जवळपास 16 लाख कार कंपनीने परत मागवल्या आहेत. परत मागवण्यात आलेल्या सर्व डिझेल कार आहेत.

आग लागण्याच्या शक्यतेमुळे या कार परत मागवण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. इंजिन गरम झाल्यानंतर ते थंड होण्यासाठी वापरण्यात येणारं उपकरण सदोष आहे, परिणामी गाड्यांना आग लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून कंपनीकडून या कार परत मागवण्यात आल्या आहेत. यापूर्वी दक्षिण कोरियामध्ये बीएमडब्ल्यूच्या काही गाड्यांना आग लागण्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. तर युरोपातही काही तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात कंपनीने 4 लाख 80 हजार कार परत मागवल्या होत्या, आणि आता पुन्हा एकदा दहा लाखांहून जास्त कार परत मागवत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.