छापा की काटा. या प्रश्नावर आपण काय उत्तर देतो हे मेंदूतील यादृच्छिक चढउतारांवर म्हणजेच उद्दीपनांवर अवलंबून असते. जेव्हा दोन सारखेच आकर्षक पर्याय आपल्यापुढे असतात, तेव्हाही याचाच वापर केला जातो असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
न्यूरोइकॉनॉमिक्स या विषयातील या संशोधनात अर्थशास्त्रज्ञांची आंतरदृष्टी व मेंदूचा वैज्ञानिक अभ्यास यांची सांगड घालून मेंदूत निर्णयाची प्रक्रिया कशी होते हे जाणून घेतले जाते. हे निर्णय घेण्यात एक वाकडेतिकडेपणा असतो ते सहजगत्या कधीच घेतले जात नाहीत.
न्यूरोइकॉनॉमिक्सचा उपयोग केवळ चांगले आर्थिक सिद्धांत तयार करण्यासाठीच केला जातो असे नाही, तर त्यातून वैद्यकीयदृष्टय़ा उपयुक्त माहितीही मिळू शकते, असे सेंट लुईस येथील वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या कॅमिलो पॅडोआ-शिओपा यांनी म्हटले आहे.
निर्णय प्रक्रियेत मेंदूच्या पेशींची भूमिका नेमकी काय असते याबाबत अभ्यास करताना पॅडोआ-शिओपा यांनी वानरांना द्राक्षाचा रस व सफरचंदाचा रस असे दोन पर्याय दिले त्यात पेयाचे प्रमाण व प्रकार यात बदल केलेला होता.
या वानरांनी यातील पेय निवडताना घेतलेल्या निर्णयाच्या वेळी मेंदूतील न्यूरॉन्सची नेमकी कृती काय घडते हे संशोधकांनी तपासून पाहिले. त्यात त्यांना असे दिसून आले, की मेंदूच्या ऑरबिटोफ्रंटल कॉर्टेक्स या भागातील पेशींमध्ये वेगवेगळ्या पातळीवर निर्णयाची ही प्रक्रिया होते.
जेव्हा विविध समूहातील पेशींची निवडलेल्या पर्यायाच्या मूल्याच्या दृष्टिकोनातून तपासणी करण्यात आली, तेव्हा त्याचा संबंधही ऑरबिटोफ्रंटल कॉर्टेक्स मधील न्यूरॉन्स समूहाशी दिसून आला. या न्यूरॉन्स समूहाच्या उद्दीपनातील बदल हे या वानरांना प्रत्यक्ष पेयांचे पर्याय देण्यापूर्वीच झाल्याचे दिसून आले, असे पॅडोआ शिओपा यांचे मत आहे. न्यूरॉन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

काही न्यूरॉन हे या पेयांचे सांकेतिक मूल्य ठरवतात. इतर न्यूरॉन हे बायनरी (द्विअंकी) पद्धतीने न्यूरॉनच्या कृतीचा परिणाम तपासतात. हे न्यूरॉन्स एकतर स्तब्ध राहतात किंवा उद्दीपित होतात असे निवडलेल्या पेयाच्या प्रक्रियेत दिसून येते.

चूका आणि असंतुलन
जेव्हा आपले आर्थिक निर्णय चुकतात तेव्हा त्यामागे आपल्या शरीराच्या काही अवस्था कारणीभूत असतात त्यात डिमेन्शिया (विसरभोळेपणा), स्किझोफ्रेनिया (दुभंगलेले व्यक्तिमत्त्व), ऑबसेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर यांचा त्यात समावेश असतो.