News Flash

ब्रज की होली

होळी आणि रंगपंचमीचं ब्रजशी आणि ब्रजवासीयांशी नातं आहे.

हा आता फोटोग्राफर आणि गोपाळांचा सण असल्यासारखं झालं आहे. त्यामुळे तिथे जाल तर तुम्हाला सगळ्यात जास्त काळजी तुमच्या कॅमेऱ्याची घ्यावी लागेल.

ट्रॅव्हलोग्राफी
रंगांचा उत्सव असलेली होळी खेळायची तर थेट कन्हैयाच्या अंगणात. इथे सगळा आसमंत  रंगरंगीला होऊन गेलेला असतो. इथल्या होळीच्या परंपराही वैशिष्टय़पूर्ण आहेत.

केरळचा ओणम् असो की पश्चिम बंगालची दुर्गापूजा. आपल्या महाराष्ट्रातील पंढरीची वारी असो की गणपती. हे उत्सव त्या त्या भागातील लोकांचे जीव की प्राण असतात. आपल्या या सणांची आपण वर्षभर वाट पाहत राहतो. तसंच काहीसं होळी आणि रंगपंचमीचं ब्रजशी आणि ब्रजवासीयांशी नातं आहे.

ब्रज (किंवा ब्रीज) म्हणजे उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर नंदगाव, मथुरा, गोकुळ आणि आजूबाजूची काही गावं मिळून जो भाग आहे तो. इथे गल्लीगल्लीत कृष्ण सापडतो. जवळजवळ आठवडाभर हा उत्सव चालतो. नंदबाबाच्या नंद गावापासून सुरू होत होत राधेच्या बरसाणापासून रंग खेळत हे सगळे ब्रिजवासी मथुरेत त्याची समाप्ती करतात.

नंदगाव म्हणजे आपण जे गोकुळ म्हणतो ते. इथे नंदबाबाचं मंदिर आहे. सुरुवातीला गायन समाज जो होळीचे पारंपरिक गीत गातो तो जमा होतो. आणि इथून रंगाचा हा महोत्सव सुरू होतो. नंदगाव आणि शेजारचे गावकरी एका ठिकाणी बसून गाण्यात एकमेकांची मस्करी करत, टर उडवत चिडवत असतात आणि याला उत्तर म्हणून की काय नंदगावचे लोक रंगाने त्यांच्यावर पाण्याचा, फुलांचा मारा करतात. जवळजवळ दोन तास हे गायन सुरू असते. यालाही शेकडो वर्षांची परंपरा आहे. पिढय़ान्पिढय़ा ही गाणी आणि गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेल्या आहेत. तुम्ही येथे पहिल्यांदा जात असाल आणि फोटोग्राफी करणार  असाल तर कॅमेऱ्याची थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. कारण यातील काही लोक भांग वगरे प्यालेले असतात आणि काहींना खरोखरच ‘रंग’ चढलेला असतो. अशावेळी जाणूनबुजून कॅमेऱ्यावर रंग फेकण्याचे प्रकारही होतात. म्हणून लेन्सची काळजी घ्यावी लागते. बाकी रंग तर तुम्ही खेळा किंवा नका खेळू, त्यापासून सुटका नाहीच. उंच टेकडीवर नंदबाबाचं मंदिर आहे तिथून संपूर्ण नंदगाव दिसते. मंदिराच्या बाहेरच गोल रिंगण करून गायनाचा कार्यक्रम आणि ब्रजची होळी सुरू होते.

गेल्या काही वर्षांपासून सगळ्या प्रसिद्ध ठिकाणी फोटोग्राफर्स वाढले आहेत, त्याला ब्रजही अपवाद नाही. समजा येथे ५०० ब्रजवासी असतील तर किमान ६०० फोटोग्राफर असतात. म्हणूनच की काय येथे वेगळा फोटो घेणे ही आता कसरतच झाली आहे. तुम्ही ब्रजची होळी पहायला जाणार असाल आणि तुमच्याकडे चांगला कॅमेरा असेल तर झूम लेन्स वापरणे जास्त फायद्याचे ठरेल. कारण त्यामुळे जास्त गर्दीत न जाता तुम्हाला हवा तसा फोटो घेता येईल. इथे ही होळी कव्हर करायला  दिल्ली आणि पश्चिम बंगालहून सर्वात जास्तफोटोग्राफर आलेले असतात. फोटोसाठी ते मारामारीवर येण्यासही कमी करत नाहीत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

यानंतर दुसरा दिवस सुरू होतो बरसाणावरून. बरसाणा म्हणजे राधेचे गाव. ब्रजवासी प्रेमाने आणि श्रद्धेने राधाराणी म्हणतात. इथेही राधेचं मंदिर आहे. नंदगावी मुक्काम केल्यानंतर गोपाळांची टोळी बरसाणाला येते. इथे त्यांचे स्वागत लाडूने होतं. त्याला लड्ड मार होली असंही म्हणतात. येथील मंदिर खूपच सुंदर आहे आणि नंदबाबा मंदिरापेक्षा थोडे मोठे असल्याने जरा वेगळे फोटोही मिळतात. इथ झूम लेन्सपेक्षा ३५ एमएम किंवा ५० एमएम लेन्स जास्त फायदेशीर ठरते.  कारण इथे गायन समाजाची जुगलबंदी फार शिस्तीत सुरू असते. त्यामुळे पुरेसा वेळ मिळतो आणि शॉट प्लान करणे शक्य होते. नंदगावपेक्षा हे गाव थोडं जास्तच खटय़ाळ आहे. म्हणून की काय फोटो काढताना कॅमेरा वाचवताना अजूनच जास्त कस लागतो. पण पोर्टेट एवढे छान मिळतात की मग सब माफ असतं. पूर्ण दिवस जातो या गावात फोटो काढण्यात.

तिसरा दिवस उजाडतो. तोपर्यंत होळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. इथेच आणि याच वेळी सुरू होते जगप्रसिद्ध ‘लठमार होळी’. याला पौराणिक संदर्भ असा आहे की कृष्ण आणि गोपाळ जेव्हा बरसाणाला यायचे तेव्हा पहिल्या दिवशी फुलांनी आणि मिठाईने त्यांचं स्वागत होतं पण नंतर हे परत जाण्याचं नावच घेत नाहीत. आणि तिथल्या गवळणींची छेडछाड सुरू करतात. त्याला वैतागून मग गवळणी काठी हातात घेतात. तिथून सुरू झाली लठमारची प्रथा. हे कव्हर करायला कुठून कुठून मीडिया आणि फोटोग्राफर येतात बरसाणाला. फोटो काढण्याच्या दृष्टीने खूपच नाटय़ पाहायल मिळते. पण इथेही तेच. कोणी मुद्दाम रंग टाकणार नाही पण चुकून एखादी काठीच लेन्सवर येऊ शकते.

इथे गल्लीबोळात छोटय़ा छोटय़ा ग्रुपने लठमार सुरू असते. एक प्रकारचं मेडिटेशन किंवा वर्षभराचा राग काढल्यासारखंच आहे हे. कारण एवढय़ा जोरात गवळणी बडवत असतात की आपल्यालाच भीती वाटते. पण नंदगावचे गोपाळसुद्धा काही कमी नसतात. त्यांचं हाताने तयार केलेल्या कापडी ढालीवर गवळणींच्या लाठय़ा झेलत त्यांना म्हणजे गवळणींना चिडवणे सुरूच असते. हसतखेळत हा दिवसही संपतो आणि मग हे गोपाळ निघतात कंस मामाच्या मथुरेत धुमाकूळ घालायला.

अशी ही ब्रजची होळी. पण याला एक हळवी किनारही आहे. ती म्हणजे या सगळ्या भागातल्या आश्रमात सोडलेल्या विधवा आणि त्यांचं आयुष्य. त्यांना या रंगांच्या उत्सवात  कुठेच स्थान नसतं. सगळं ब्रज रंगलेलं असताना या आपल्या पांढऱ्या साडय़ा नेसून कुठे तरी दूर बसून हे सगळं पाहत असतात. शेकडो वर्षांपासून हे असंच सुरू आहे. यात बदल करायचा म्हणून काही वर्षांपासून यांच्यासाठी एक दिवस फुलांची होळी खेळली जाते. त्यात रंग नाही तर फुलं वापरली जातात.  मागच्या वर्षी ती पहायचं राहून गेलंय. यावर्षी परत जातोय ही फुलांची होळी पहायला आणि त्यातले रंग टिपायला.

कॅमेऱ्याची काळजी :

तुम्ही ब्रजला होळी पहायला जाणार असाल तर मथुरेमध्ये रहाण्याची सोय आहे. ते धार्मिक स्थळ असल्याने हॉटेल्स वगरे छान आहेत. विमानाने जाणार असाल तर दिल्ली हे जवळचं विमानतळ आहे. दिल्लीहून रेल्वे आणि बसचे भरपूर पर्याय आहेत. रेल्वेने जाणार असाल तर मुंबईहून मथुरेला जाणाऱ्या बऱ्याच ट्रेन आहेत. तिथे जाण्यासाठी कमीत कमी तीन दिवसांच्या ट्रिपचं नियोजन करणं आवश्यक ठरेल.

हा आता फोटोग्राफर आणि गोपाळांचा सण असल्यासारखं झालं आहे. त्यामुळे तिथे जाल तर तुम्हाला सगळ्यात जास्त काळजी तुमच्या कॅमेऱ्याची घ्यावी लागेल. कॅमेऱ्यासाठी महागडे कव्हर न घेता तुम्ही तो साध्या कॅरिबगमध्ये पण नीट झाकून, चिकटपट्टीने बंद करू शकता. ४००-५०० रुपयात रेनकव्हरही ऑनलाइन मिळतात. शक्य असेल तर दोन कॅमेरे वापरा. त्यामुळे लेन्स बदलताना त्यात रंगांचे कण व धूळ जायचा धोका कमी होईल. आणि सर्वात महत्वाचे हसत खेळत फोटो काढा. इतर फोटोग्राफर्ससोबत वाद घालू नका. कारण तिथे तेच जास्त संख्येने असतात. कोण कधी तुमचा मूड खराब करेल सांगता येत नाही. म्हणून रंगाची मजा घेण्यास जा आणि येताना मिळतील तसे फोटो घेऊन या.
गणेश बागल – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 12:43 pm

Web Title: braj holi lokprabha article
Next Stories
1 या आसनाने होईल गॅसेसचा त्रास दूर
2 सापाच्या विषातील घटक संधिवातावर गुणकारी
3 प्रसन्न राहण्यासाठी करा ‘हे’ उपाय
Just Now!
X