महिला कारागिरांनी स्वत:च्या हातांनी विणलेल्या विविध डिझायनर स्कार्फची मालिका ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने सुरू केली आहे. आगामी ‘विल्स लाईफस्टाईल इंडिया फॅशन वीक स्प्रिंग समर २०१४’मध्ये या मालिकेचे अनावरण केले जाणार आहे.
ऑक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ दरम्यान भारतात होणा-या ‘ओझी फेस्ट’ या ऑस्ट्रेलियन सांस्कृतिक महोत्सवातील प्रदर्शनात हे स्कार्फ पाहायला मिळतील.
दिल्लीमध्ये होणा-या ‘विल्स इंडिया फॅशन वीक’मध्ये ऑस्ट्रेलियन डिझायनर्सनी बनवलेल्या कपड्यांच्या प्रदर्शनाद्वारे या वर्षीच्या ‘ओझी फेस्ट’ची सुरूवात होणार आहे.
‘आर्टीसान ऑफ फॅशन’ या सामाजिक संस्थेद्वारे कुमॉन येथील पंचचुली विणकर आणि लोकरीचे काम करणा-या महिलांसाठी राबवल्या जाणा-या या उपक्रमासाठी ब्रेट ली सदर संस्थेबरोबर काम करीत आहे. ‘ऑस्ट्रेलियन मेरिनो वूल’ या कंपनीच्या लोकरीचा वापर करून तयार करण्यात येणारे हे स्कार्फ, हिमालयाच्या पायथ्याशी राहणा-या पंचचुला विणकर महिलाच्या हस्ते विणले जाणार आहेत.
भारत हे माझे दुसरे घर असून, भारताची विविधता आणि मनावर छाप पाडणा-या छबींविषयी माझी अनेकदा ऑस्ट्रेलियातील माझ्या मित्रांससोबत चर्चा होत असते. ओझी फेस्टमुळे भारतीयांना ऑस्ट्रेलियाची आधुनिकता आणि सांस्कृतिक विविधतेविषयी अधिक काही सांगण्याची मला संधी मिळणार असल्याचे याआधी अनेक भारतीय कलाकार आणि कारागिरांबरोबर काम केलेला ब्रेट लीने सांगितले. दोन्ही देशांतील लोक जेव्हा कल्पनांची देवाण-घेवाण करून एकत्र काम करतात तेव्हा उत्तम असे परिणाम साधले जात असल्याचे देखील तो म्हणाला. मागील वर्षी सुरू झालेल्या ‘ओझी फेस्ट’चा ली हा अॅम्बेसेडर आहे.