Honda ने BS6 Activa 125 स्कूटर लाँच केली आहे. भारत स्टेज-6 (BS6) मानकांनुसार होंडाची ही पहिलीच स्कूटर आहे. नवीन Activa स्टँडर्ड, अॅलॉय आणि डिलक्स अशा तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असेल.

साइड स्टँड खाली असेल तर स्टार्ट नाही होणार स्कूटर –
नव्या Activa मध्ये साइड-स्टँड-डाउन इंडिकेटर हे फीचर आहे. यामुळे जर स्कूटरचं साइड स्टँड खाली असेल, किंवा स्टँड वरती करण्यास तुम्ही विसरलात तर ही स्कूटर स्टार्ट होणार नाही. याशिवाय पुढील बाजूला ग्लव्ह बॉक्स आणि एक्सटर्नल फ्युअल-फिलर कॅप देखील आहे. नव्या Activa मध्ये बीएस6, 124 cc क्षमतेचं फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 6,500 rpm वर 8.1 bhp ऊर्जा निर्माण करतं. बीएस4 मॉडलच्या तुलनेत याचं आउटपुट कमी आहे. मात्र, जुन्या बीएस4 Activa पेक्षा नव्या स्कूटरचा मायलेज अधिक आहे असा कंपनीचा दावा आहे. तसंच यामुळे प्रदूषण देखील कमी होईल असं कंपनीने म्हटलं आहे. होंडाने नव्या स्कूटरमध्ये जुन्या मॉडलच्या तुलनेत काही नवीन फीचर्स दिले आहेत. यामध्ये नॉइजलेस स्टार्टर सिस्टिम, डिजिटल अॅनालॉग इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि आयडल स्टार्ट-स्टॉप सिस्टिमचा समावेश आहे. नव्या इंस्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये रिअल टाइम मायलेज आणि रेंजबाबत माहितीही मिळेल.

फ्रेश लूक –
फ्रेश लूक देण्यासाठी यामध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आलेत. चार रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या स्कूटरचे हेडलाइट आणि फ्रंट लूक शार्प आहेत. याशिवाय साइड पॅनल्सवर क्रोम फिनिशिंग देण्यात आली आहे.

किंमत –
स्टँडर्ड, अॅलॉय आणि डिलक्स या तीन व्हेरिअंट्सची किंमत अनुक्रमे 67 हजार 490 रुपये, 70 हजार 990 रुपये आणि 74 हजार 490 रुपये इतकी किंमत आहे. म्हणजेच बेसिक व्हेरिअंटची किंमत बीएस-4 अॅक्टिव्हा डिस्क व्हेरिअंटपेक्षा 2 हजार 478 रुपयांहून अधिक आहे.