‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या मालकीच्या क्लासिक लीजंड्स कंपनीने भारतात अपडेटेड BS6 इंजिनसह ‘जावा’ आणि ‘जावा 42’ या दोन बाइक वर्षाच्या सुरूवातीला लाँच आणल्या होत्या. आता क्लासिक लिजंड्सने देशभरातील आपल्या डीलरशिप्सद्वारे या दोन्ही बाइकच्या डिलिव्हरीलाही सुरूवात केली आहे. दोन्ही बाइक आता कंपनीच्या अधिकृत डीलरशिपमध्ये टेस्ट राइड आणि बूकिंगसाठी उपलब्ध झाल्या आहेत. डीलरशिपमध्ये बूकिंगसाठी कंपनीने पहिल्या तीन ईएमआयवर 50 टक्के सवलत, दरमहा 5,555 रुपये ईएमआय यांसारखे अनेक पर्याय ठेवले आहेत.

कंपनीने सर्वात आधी नोव्हेंबर 2018 मध्ये ‘जावा’ आणि ‘जावा 42’ या दोन बाइक लाँच केल्या होत्या. त्यानंतर बदललेल्या नियामाप्रमाणे कंपनीने या वर्षाच्या सुरूवातीला या दोन्ही बाइक अपडेटेड BS6 इंजिनमध्ये आणल्या. BS6 इंजिन असलेली जावा (Jawa) बाइक ब्लॅक, ग्रे आणि मरून अशा तीन रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. ही बाइक सिंगल चॅनल आणि ड्युअल-चॅनल ABS अशा दोन पर्यायांमध्ये आहे.  दुसरीकडे, BS6 इंजिनची ‘जावा 42’ ही बाइक सहा कलर्सच्या पर्यायांमध्ये येते.

इंजिन –
2020 Jawa आणि Jawa 42 दोन्ही बाइकमध्ये BS6 कंप्लायंट 293cc, सिंगल-सिलिंडर, फोर स्ट्रोक, लिक्विड-कुल्ड इंजिन असून यात फ्युअल इंजेक्शन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बाइकमध्ये क्रॉस पोर्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून, याचा वापर करणारी ही भारतातील पहिलीच बाइक असल्याचं सांगितलं जात आहे. BS4 व्हेरिअंटप्रमाणे Jawa आणि Jawa 42 बाइकचे BS6 इंजिन 27bhp पीक पावर आणि 28Nm पीक टॉर्क निर्माण करते. बाइकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स असून सस्पेंशनसाठी पुढील बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क आणि मागे ड्युअल शॉक्स आहे. बेसिक व्हेरिअंटमध्ये रिअर ड्रम ब्रेक आहे.

किंमत –
BS6 इंजिनच्या Jawa सिंगल-चॅनल ABS व्हेरिअंटची किंमत 1.73 लाख रुपयांपासून पुढे आहे. तर, Jawa ड्युअल-चॅनेल ABS व्हेरिअंटची किंमत 1.82 लाख ते 1.83 लाख रुपयांदरम्यान आहे.  दुसरीकडे, BS6 इंजिनची ‘जावा 42’ ही बाइक सहा कलर्सच्या पर्यायांमध्ये येते. या बाइकच्या सिंगल-चॅनल ABS व्हेरिअंटची किंमत 1.60 लाख रुपयांपासून सुरू होते. तर, Jawa 42 बाइकच्या ड्युअल-चॅनेल ABS व्हेरिअंटची किंमत 1.69 लाख रुपयांपासून सुरू होते.  या सर्व एक्स-शोरुम किंमती आहेत.