फ्रान्सची ऑटो कंपनी Renault ने कमी किंमतीतील हॅचबॅक कार Kwid नवीन व्हेरिअंटमध्ये (Renault Kwid RXL 1.0-litre)आणली आहे. यासोबतच कंपनीने भारतीय मार्केटमध्ये 3.5 लाखांपेक्षा जास्त क्विड गाड्यांची विक्री झाल्याचीही माहिती दिली आहे. BS-VI इंजिनच्या निकषासह आलेल्या या नव्या व्हेरिअंटमध्ये मॅन्युअल आणि एएमटी, दोन्ही गिअरबॉक्सचा पर्याय आहे. यात 1.0-लीटर, 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन असून हे इंजिन 67bhp ची पॉवर आणि 91Nm टॉर्क निर्माण करतं. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे. आतापर्यंत हे इंजिन क्विडच्या केवळ टॉप व्हेरिअंटमध्ये (RXT आणि CLIMBER)दिलं जात होतं.

1.0-लिटर इंजिनच्या नवीन RXL व्हेरिअंटमध्ये सिंगल-डिन ब्लूटूथ ऑडिओ सिस्टिम, स्प्लिट हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, रूफ स्पॉइलर, पॉवर स्टिअरिंग, फ्रंट पॉवर विंडो, रिमोट सेंट्रल लॉकिंग आणि इंटरनल अॅड्जस्टेबल मिरर्स यांसारखे फीचर्स मिळतील. ही छोटी कार ब्लू, फेअरी रेड, आइस कूल व्हाइट, मून लाइट सिल्वर, आउटबॅक ब्रॉन्झ आणि इलेक्ट्रिक ब्लू अशा 6 कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. सुरक्षेसाठी कारमध्ये ड्राइव्हर साइड एअरबॅग, सीट-बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टिम, एबीएस, ईबीडी आणि रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारखे फीचर्स आहेत.

रेनॉने कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक ऑफरही आणल्या आहेत. यामध्ये ‘बाय नाऊ पे लेटर’,म्हणजे ‘आता खरेदी करा आणि नंतर पैसे भरा’ या ऑफरचाही समावेश आहे. ‘बाय नाऊ पे लेटर’ या ऑफरनुसार, जर तुम्ही आज रेनॉ कार खरेदी केली तर ईएमआय 3 महिन्यांनंतर सुरू होईल. ‘बाय नाऊ पे लेटर’ या ऑफरचा फायदा कंपनीच्या डीलरशिप, वेबसाइट किंवा माय रेनॉ अॅपद्वारे घेता येईल. याशिवाय कंपनी कॅश डिस्काउंट, ऐक्स्चेंज बोनस आणि 8.25 टक्क्यांवर लोन या ऑफरही देत आहे. BS-VI इंजिनच्या निकषासह आलेल्या या नव्या कारची बेसिक किंमत(एक्स-शोरुम) 4.16 लाख रुपये आहे. मॅन्युअल मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 4.16 लाख आणि एएमटी मॉडेलची किंमत 4.88 लाख रुपये आहे.