गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल सातत्याने नवनवे रिचार्ज प्लॅन आणि ऑफर सादर करत आहे. याचाच पुढील भाग म्हणून बीएसएनएलने आता नवीन BSNL 4G Plus ही सेवा लाँच केली आहे. टेलिकॉम टॉकच्या वृत्तानुसार, या सेवेद्वारे बीएसएनएलचे ग्राहक देशभरात कुठेही जेथे BSNL Wi-Fi हॉटस्पॉट उपलब्ध असेल त्या ठिकाणाहून फोनवर इंटरनेटचा वापर करु शकणार आहेत.

बीएसएनएल 4G प्लसचे फायदे –
बीएसएनएल वाय-फाय हॉटस्पॉटच्या रेंजमध्ये युजर आल्यास वाय-फायद्वारे इंटरनेटचा वापर करता येईल. यासाठी मोबाईलमध्ये 4G नेटवर्कची आवश्यकता नाही.

कसा करायचा वापर –
तीन प्रकारे ही सेवा वापरता येईल. यातील पहिला प्रकार म्हणजे ‘ईएपी’द्वारे (Extensible Authentication Protocol) नंबर अॅक्टिवेट करणं आणि दुसरा प्रकार म्हणजे Non-EAP प्रकारे नंबर अॅक्टिवेट करणं. नॉन-ईएपीप्रकारे लॅपटॉप आणि टॅबलेटद्वारे नंबर अॅक्टिवेट करता येईल. याशिवाय मोबाईल अॅपद्वारेही ही सेवा वापरता येईल.

ईएपी डिव्हाइसला असं करा अॅक्टिवेट –
ईएपीद्वारे नंबर अॅक्टिवेट करण्यासाठी डिव्हाइसचं वाय-फाय सुरू करावं लागेल. यानंतर BSNL 4G Plus वाला SSID पर्याय निवडा. यानंतर सीम कार्ड ऑथेंटिकेशनसाठी ईएपी सिलेक्ट करुन बीएसएनएल सीम स्लॉटवर टॅप करा. ऑथेंटिकेशन झाल्यावर नेटवर्क जॉइन करण्यासाठी कनेक्ट या पर्यायावर क्लिक करा.

नॉन-ईएपी डिव्हाइसला असं करा अॅक्टिवेट –
नॉन-ईएपी डिव्हाइसवर सर्वप्रथम वाय-फाय सुरू करा. नंतर बीएसएनएल 4जी प्लस एसएसआयडी हा पर्याय निवडा. त्यानंतर ज्या नंबरवरती लॉगइन पिन तुम्हाला हवा असेल तो मोबाईल नंबर टाका. मोबाईलवर आलेला पिन क्रमांक टाकून लॉगइन करता येईल.

मोबाईल अॅपद्वारेही करता येईल अॅक्टिवेट-
यासाठी सर्वप्रथम BSNL 4G Plus हे अॅप डाउनलोड आणि इंस्टॉल करुन बीएसएनएलच्या नंबरद्वारे साइन-इन करता येईल. ही सेवा सुरू करण्यासाठी फोनच्या पहिल्या किंवा मुख्य स्लॉटमध्ये बीएसएनएलचं सिम कार्ड असणं आवश्यक आहे. यानंतर बीएसएनएल मोबाइल युजर ऑफलोड येथे क्लिक करुन बीएसएनएल 4जी प्लससाठी लॉगइन करु शकतात.