टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या प्रचंड प्राइस वॉर सुरू आहे. दररोज प्रत्येक कंपनी नवनवे प्लॅन्स सादर करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर जाहीर करत त्यांना खूश करायचे ठरवले आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी ३४९ रुपयांचा प्लॅन जाहीर केला आहे. याची वैधता ५४ दिवसांची असून यामध्ये दिवसाला १ जीबी डेटा देण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना व्हॉईस कॉलिंगबरोबरच दररोज १०० मेसेज मोफत दिले जाणार आहेत. याआधी बीएसएनएलने ९९ आणि ३१९ रुपयांचे दोन प्लॅन लाँच केले होते. त्यानंतर आता हा ३४९ रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे.

बीएसएनएलप्रमाणेच जिओनेही ३४९ रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगबरोबरच रोज १०० मेसेज आणि १.५ डेटा मिळत होता, या प्लॅनची व्हॅलिडिटीही ७० दिवसांची आहे. आता बीएसएनएल काही ठराविक सर्कलमध्ये ४ जी सुविधा देत आहे. त्यामुळे इतर कंपन्यांना टक्कर देत टेलिकॉम क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यात कंपनीला काही प्रमाणात यश आले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. रिलायन्स जिओने आपला मोफत फोन बाजारात आणल्यानंतर विविध कंपन्या या स्पर्धेत उतरल्या. त्यानंतर एअरटेलनेही आपला स्वस्तातील मोबाइल लाँच केला होता. त्यापाठोपाठ काही दिवसांपूर्वीच बीएसएनएलने इतक्या कमी किंमतीचा फिचर फोन लाँच करत आपल्या ग्राहकांना खूश केले आहे.