ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या निरनिराळ्या ऑफर्स आणत आहेत. आता सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने ब्रॉडबँड युजर्ससाठी शानदार ऑफर आणली आहे. याअंतर्गत कंपनी आपल्या ब्रॉडबँड युजर्सना 99 रुपयांत Google Nest Mini आणि 199 रुपये दरमहिन्यामध्ये Google Nest Hub ची ऑफर देत आहे.

बीएसएनएलची ही प्रमोशनल ऑफर असून 18 फेब्रुवारीपासून या ऑफरला सुरूवात झालीये. ही प्रमोशनल ऑफर केवळ 90 दिवसांसाठी वैध असेल. गुगल नेस्ट मिनी नोव्हेंबर 2019 मध्ये लाँच करण्यात आला होता आणि 4 हजार 499 रुपये इतकी याची सुरूवातीची किंमत आहे. फ्लिपकार्टवर याची किंमत 3 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, Google Nest Hub ची सुरूवातीची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. पण , फ्लिपकार्टवर याची किंमत 8 हजार 99 रुपये आहे. बीएसएनएलच्या ऑफरमध्ये तुम्ही हे दोन्ही प्रोडक्ट्स आकर्षक ईएमआयवर खरेदी करु शकतात. बीएसएनएलचे जे ग्राहक 799 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचे वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅन घेतील त्यांना या ऑफरचा फायदा मिळेल. सेकंड जनरेशन स्मार्ट स्पीकर गुगल नेस्ट मिनी खरेदी करण्यासाठी युजर्सना 1287 रुपये (वन-टाइम चार्ज) भरावे लागतील. याशिवाय जर तुम्ही Google Nest Hub घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 2,587 रुपयांचे वन-टाइम पेमेंट करावे लागेल.

गुगल नेस्ट हब म्हणजे स्मार्ट डिस्प्ले असलेला स्पीकर आहे. हा स्पीकर 7 इंच टचस्क्रीन पॅनल, पुढील बाजूला EQ Light सेंसर, दोन फार-फील्ड मायक्रोफोन आणि एक फुल रेंज बॅक स्पीकरसोबत येतो. बीएसएनएल डीएसएल किंवा भारत फायबर कस्टमर कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवर आगाऊ पेमेंट केल्यानंतर वार्षिक सब्सक्रिप्शन घेऊ शकतात. ही ऑफर सध्या चेन्नई सर्कलमधील बीएसएनएलच्या ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे, पण लवकरच सर्व सर्कलमध्ये उपलब्ध केली जाण्याची शक्यता आहे.