लॉकडाउनमध्ये सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना गुड न्यूज दिली आहे. लॉकडाउन असल्याने घरीच बसावं लागत असलेल्या आपल्या ग्राहकांच्या मनोरंजनासाठी बीएसएनएलने एक शानदार ऑफर आणली आहे.

बीएसएनएल आपल्या ग्राहकांना अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता म्हणजे अगदी मोफत देत आहे. ९९९ रुपयांची किंमत असलेली अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप बीएसएनएलने फ्री मध्ये देणे सुरू केले आहे. मात्र, ही ऑफर केवळ कंपनीच्या पोस्टपेड आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठीच आहे. प्रीपेड ग्राहकांना याचा लाभ मिळणार नाही.

३९९ रुपयांपेक्षा अधिकचा पोस्टपेड प्लॅन असणाऱ्या सर्व ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळेल. यामध्ये ४०१ रुपये, ४९९ रुपये, ५२५ रुपये, ७२५ रुपये, ७९८ रुपये, ७९९ रुपये, ११२५ रुपये आणि १५२५ रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. याशिवाय ७४५ रुपयांपेक्षा अधिकचा ब्रॉडबँड प्लॅन असणाऱ्यांनाही या ऑफरचा लाभ मिळेल.

दरम्यान, टाळेबंदी काळात भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) पुणे विभागाच्या ८३ टक्के ग्राहकांकडून दूरध्वनी, मोबाइल यांची देयके (बिले) ऑनलाइन भरणा करण्यात आली आहेत. टाळेबंदीत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बीएसएनएलकडून येत्या २७ एप्रिलपर्यंत देयक भरले नाही, तरीही अखंड सेवा दिली जाणार आहे. असे असतानाही एवढय़ा प्रमाणात देयकांचा भरणा झाल्याने ग्राहकांचा बीएसएनएलवरील विश्वास दृढ असल्याची भावना बीएसएनएल पुणे विभागाचे महाव्यवस्थापक संदीप सावरकर यांनी व्यक्त केलीये. बीएसएनएलच्या ग्राहकांना आपली देयके http://www.bsnl.co.in या संकेतस्थळावर वा अ‍ॅमेझॉन पे, पेटीएम व अशा प्रकारच्या विविध अ‍ॅपद्वारेही भरण्याची सुविधा आहे. याबरोबरच लवकरच बीएसएनएलच्या मोबाइलचा रिचार्ज आणि देयके भरण्याची सुविधा टपाल कार्यालयांतूनही सुरू करण्यात येणार आहे.