खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्याचा बीएसएनएलकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कंपनी सातत्याने नवनवीन प्लान लाँच करत असते. आता कंपनीने 96 आणि 236 रुपयांचे दोन नवे प्लान लाँच केले आहेत. या दोन्ही प्लानमध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त डेटाचे फायदे मिळतील.

अनुक्रमे 28 दिवस आणि 84 दिवस इतकी या दोन्ही प्लानची वैधता आहे. विशेष म्हणजे या दोन्ही प्लानमध्ये युजर्सना दररोज 10 जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. म्हणजेच, BSNL STV 96 या प्रीपेड प्लानमध्ये एकूण 280 जीबी डेटा मिळेल, तर BSNL STV 236 या प्रीपेड प्लानमध्ये एकूण 840 जीबी डेटा मिळेल.

टेलीकॉम टॉकच्या वृत्तानुसार, या दोन्ही प्लानमध्ये ग्राहकांना कॉलिंगची सुविधा मिळणार नाही, केवळ डेटासाठी हे प्लान आहेत. याशिवाय लाँच केलेले दोन्ही नवीन विशेष टेरिफ व्हाऊचर्स मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असणार आहे. बीएसएनएलची 4जी सेवा उपलब्ध आहे तेथील मार्केटसाठीच कंपनीने हे प्लान लाँच केले आहेत. महाराष्ट्रात काही ठरावीक ठिकाणी कंपनीची 4जी सेवा सुरू झाली आहे. बीएसएनएलचे 4जी नेटवर्क सध्यातरी फक्त महाराष्ट्रातील अकोला, बीड, जालना, उस्मानाबाद आणि आसपासच्या क्षेत्रात अॅक्टिव्ह आहे. या प्लानच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बीएसएनएलचे 4जी नेटवर्क अॅक्टिव्ह आहे त्या ठिकणच्या अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.