खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आपले प्लॅन्स सातत्याने बदलत आहे. यासोबतच कंपनी सतत नवनवे प्लॅन्स लाँचही करत आहे. याच क्रमात आता कंपनीने एक शानदार नवीन प्लॅन आणलाय. इंटरनेटचा अधिक वापर करणाऱ्यांसाठी हा प्लॅन फायद्याचा आहे.

बीएसएनएलने 551 रुपयांचा नवा प्लॅन आणला असून या प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता मिळेल. याशिवाय युजर्सना दररोज 5 जीबी डेटाचा वापर करता येईल. म्हणजेच 90 दिवसांसाठी एकूण 450GB डेटा मिळेल. पण हा केवळ डेटा प्लॅन आहे, त्यामुळे युजर्सना या प्लॅनमध्ये कॉलिंग, एसएमएस किंवा अन्य सुविधांचा लाभ मिळणार नाही.

याशिवाय BSNL कडे 998 रुपयांचा एक जास्त वैधता असलेला प्लॅनही आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा मिळतो. 240 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये कंपनीकडून मर्यादित कालावधीसाठी ३० दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. म्हणजे या ऑफर अंतर्गत तुम्हाला 270 दिवसांची वैधता मिळेल. पण यासाठी तुम्हाला 31 मार्च 2020 आधी रिचार्ज करावं लागेल.

आणखी वाचा- Vodafone-Idea चा धमाका, आता मिळणार दुप्पट डेटा

दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात खासगी कंपन्यांनी केलेल्या टॅरिफ दरवाढीचा चांगलाच फायदा सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला झालाय. ट्रायच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2019 मध्ये बीएसएनएलने देशातील इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीच्या तुलनेत सर्वाधिक ग्राहक मिळवले. नवीन ग्राहकांच्या बाबतीत बीएसएनएलनंतर दुसऱ्या क्रमांकावर रिलायंस जिओचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे लाँच झाल्यापासून पहिल्यांदाच जिओला 5 दशलक्षपेक्षा कमी नवे ग्राहक मिळालेत. बीएसएनएलसोबत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 4.2 लाख नवीन ग्राहक जोडले गेले. तर याच महिन्यात जिओकडे मात्र केवळ 82 हजार 308 नवीन ग्राहक आले. दुसरीकडे व्होडाफोन-आयडियापासून सर्वाधिक ग्राहक दूर गेले. त्यानंतर भारती एअरटेल आणि एमटीएनएलला सर्वाधिक फटका बसला. रिलायंस जिओने सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय बाजारात एंट्री घेतली. तेव्हापासून जवळपास प्रत्येक महिन्यात किमान पाच दशलक्ष नवीन ग्राहक जिओकडे येत होते. पण गेल्यावर्षी झालेली टॅरिफ दरवाढ आणि IUC दरांचा फटका जिओला बसला आणि त्यांच्या ग्राहक संख्येत कमालीची घट झाली. मात्र, डिसेंबरमध्ये केवळ 82 हजार 308 नवीन ग्राहक मिळाले असतानाही जिओची टेलिकॉम मार्केटमधील सर्वाधिक हिस्सेदारी (32.14%) कायम आहे. दुसरीकडे BSNLने डिसेंबर महिन्यात सर्वाधिक 4 लाख 27 हजार 089 नवीन ग्राहक जोडले आणि पहिल्यांदाच याबाबतीत जिओवर मात केली. 10.26% इतकी बीएसएनएलची टेलिकॉम मार्केटमधील हिस्सेदारी आहे. डिसेंबर 2019 च्या सुरूवातीला आघाडीच्या सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ केली होती. पण बीएसएनएलने आपले दर वाढवले नव्हते. त्याचाच त्यांना फायदा झाल्याचं दिसतंय.