रिलायन्स जिओ भारतीय बाजारात दाखल झाल्यापासून इतर सर्वच टेलिकॉम कंपन्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक नामांकित कंपन्यांनी आपले अनोखे प्लॅन्स जाहीर करण्यास सुरुवात केली. मागच्या काही दिवसांत जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेल यांसारख्या कंपन्यांनी आपले इंटरनेट आणि कॉलिंगचे स्वस्तातील प्लॅन्स बाजारात आणले.

त्यानंतर आता भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने एक जबरदस्त ऑफर आणली आले. या नव्या ऑफर अंतर्गत अवघ्या ७ रुपयांच्या रिचार्जवर ६० रुपयांचा टॉकटाईम मिळणार आहे. यासोबतच कंपनीकडून ५०० एमबी इंटरनेट डेटाही मोफत दिला जात आहे. विशेष म्हणजे या प्लॅनची वैधता २८ दिवसांपर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही बीएसएनएलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे.

ग्राहकांना आपल्या सेवेत टिकवून ठेवणे आणि त्यांना जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्यासाठी सध्या जवळपास सर्वच कंपन्या धडपडत आहेत. बीएसएनएलची ही ऑफर म्हणजे त्याचेच एक उदाहरण आहे असे म्हणता येईल. तुम्ही बीएसएनएलचे ग्राहक नसाल तर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक पोर्ट करुनही हा प्लॅन घेऊ शकता. त्यामुळे नव्याने होणाऱ्या ग्राहकांनाही या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.