भारतातील दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच काही दिवसांपासून आययूसी म्हणजेच इंटर कनेक्शन चार्जेसचा मुद्दा फार गाजत आहे. आययूसी बंद तुर्तास तरी बंद होणार नसल्यानं रिलायन्स जिओने मोफत कॉलिंग सेवा बंद करून रिलायन्स जिओवरून अन्य कंपन्यांच्या नंबरवर कॉलसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. जिओने ग्राहकांकडून आता प्रति मिनिट सहा पैसे असा दर आकारण्यास सुरूवात केली आहे. अशातच अन्य कंपन्यांनी आपण आययूसी घेणार नसल्याचं सांगत ग्राहकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यातच आता सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने मोठा निर्णय घेत बीएएनएलवरून अन्य कंपन्यांच्या नंबरवर कॉल केल्यास ग्राहकांनाच पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्येक पाच मिनिटांच्या कॉलसाठी बीएसएनएल ग्राहकांना सहा पैसे परत करणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. कॅशबॅकच्या स्वरूपात ही रक्कम कंपनी आपल्या ग्राहकांना देणार आहे. देशभरातील बीएसएनएल वायरलाईन, ब्रॉडबँड आणि एफटीटीएच ग्राहकांना या सेवेचा फायदा मिळणार आहे. दरम्यान, कंपनीच्या या नव्या निर्णयामुळे कंपनीला नवे ग्राहक मिळण्याची शक्यता मिळण्याची शक्यता आहे.

जिओच्या दमदार एन्ट्रीनंतर दूरसंचार क्षेत्रातील सर्वच कंपन्यांचे धाबे दणाणले होते. जिओच्या मोफत कॉलिंग सेवेमुळे अन्य मोबाईल कंपन्यांनीही मोफत कॉलिंगची सेवा देण्यास सुरूवात केली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून आययूसीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अशातच बीएसएनएलनं ग्राहकांना पैसे देणारी नवी योजना सुरू केली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या काही अहवालांनुसार जिओने शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिओच्या अनेक ग्राकांनी नाराजी व्यक्त करत अन्य कंपन्यांकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. आता बीएसएनएलनं नवी योजना सुरू करून अन्य कंपन्यांसमोर एक आव्हान उभं केलं आहे.