सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. कंपनीने पुन्हा एकदा आपल्या 99 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्ये मोठा बदल केला आहे. कंपनीने या व्हाउचरची वैधता कमी केली असून आता याची वैधता केवळ 22 दिवसांची झाली आहे. पण, वैधता कमी केली असली तरी कंपनी आता या प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदे देत आहे.

बीएसएनएलच्या 99 रुपयांच्या व्हाउचरमध्ये आता 24 दिवसांऐवजी 22 दिवसांची वैधता मिळेल. पण यासोबत आता ग्राहकांना पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन (PRBT)ही सुविधा 22 दिवसांपर्यंत मोफत मिळेल. आतापर्यंत कंपनी या सेवेसाठी प्रत्येक महिन्याला 30 रुपये दर आकारत होती. तसेच साँग सिलेक्शनसाठी 12 रुपयेही द्यावे लागत होते. पण आता ही सुविधा 22 दिवसांपर्यंत मोफत मिळेल. याशिवाय या व्हाउचरमध्ये 22 दिवसांपर्यंत दररोज कॉलिंगसाठी 250 FUP मिनिटे मिळतील.

बीएसएनएलचा हा प्लॅन आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगढ़, चंदीगड, चेन्नई, दमन आणि दिव, दादरा आणि नगर हवेली, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर झारखंड, कर्नाटक, कोलकाता, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, पंजाब, पुडुचेरी, राजस्थान, सिक्किम, तेलंगाना, उत्तर प्रदेश (काही भाग), उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उपलब्ध आहे. तर, लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार सर्कलमध्ये हे सेवा लागू नसेल. 99 रुपयांचे हे व्हाउचर कंपनीने सर्वप्रथम 2018 मध्ये आणलं होतं. त्यावेळी या प्लॅनची वैधता 26 दिवस होती. त्यानंतर वैधता कमी करुन 24 दिवस झाली, आणि आता ही वैधता 22 दिवस करण्यात आली आहे.