तात्पुरता गेलेला ‘मूड’ किंवा उदासपणा घालवण्यासाठी थोडीशी खरेदी हा एक चांगला विरंगुळा! खरेदी करणं तेवढय़ापुरता आनंद देते, मन ताजंतवानं करतं. पण एखाद्याला खरेदीचं व्यसनच लागलं तर? ठरावीक वेळी काहीतरी खरेदी करण्याची तीव्र इच्छा होणं, गरज नसतानाही सतत आणि अमाप खरेदी करीत राहणं म्हणजे तुम्हाला खरेदीचं व्यसन लागल्याचं निदर्शक आहे.  

खरेदी हा अनेकांच्या बाबतीत मनाची मरगळ घालवण्यासाठीचा एक चांगला पर्याय ठरतो. नेहमी आपण दैनंदिन कामात अडकलेलो असतो. विशेषत: स्त्रिया आपली नोकरी आणि उरलेल्या वेळात घरचे लोक, मुलं-बाळं यांचं हवं-नको बघण्यात स्वत:ला इतक्या गुरफटून घेतात की त्यांना स्वत:साठी वेळच मिळत नाही. हा स्वत:चा वेळ त्यांना खरेदीत मिळू शकतो. मनाला ताजंतवानं करण्यासाठी खरेदी एखाद्या थेरपीसारखीच काम करते. पण ही खरेदी जेव्हा विरंगुळ्यापुरती मर्यादित न राहता ती गरज नसताना आणि वारंवार केली जाते तेव्हा तिचं व्यसन होतं.

how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
how to use coconut oil
पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ तेल वापरून पाहा, तेलात फक्त मेथी दाणे टाकून करा केसांची मालिश
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स
how to Make green chili pickle
घरच्या घरी झटपट बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं! जेवणाबरोबर तोंडी लावा, नोट करा सोपी रेसिपी

काय आहे खरेदीचं व्यसन?
या व्यसनाला वैद्यकीय भाषेत ‘कंपल्सिव्ह बायिंग’ किंवा ‘शॉपिंग डिसऑर्डर’ म्हणतात. जसं दारू पिण्याचं व्यसन असलेल्या माणसाला ठरावीक वेळी व्यसन करण्याची तीव्र इच्छा होते आणि काहीही करून व्यसन करण्याची त्याची तयारी असते, अगदी तसंच खरेदीच्या व्यसनाचं आहे. हे व्यसन असलेल्या व्यक्तीला खरेदी करण्याची तीव्र इच्छा असते. आपण जी खरेदी करणार आहोत ती आता करणं खरंच गरजेचं आहे का, आपण वायफळ खर्च तर करीत नाही ना, यातल्या कुठल्याच गोष्टीचा विचार त्या वेळी केला जात नाही. ‘मला आताच्या आता काहीही करून अमुक खरेदी करायलाच हवी,’ इतकीच भावना त्या व्यक्तीच्या मनात असते. खरेदी केली नाही तर मग चिडचिड होते, प्रचंड अस्वस्थ, बेचैन व्हायला होतं, उदासही वाटू लागतं.
 
हे व्यसन कसं लागतं?
– आई-वडिलांना आपल्या मुलांना वेळ देणं शक्य नसेल तर ती कमतरता अनेकदा कोणत्या तरी वस्तूने भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. ‘आम्ही आमच्या मुलाला काहीही कमी पडू देत नाही,’ या आविर्भावात व्हिडीओ गेम, सायकल, स्वतंत्र टीव्ही, वाढीव ‘पॉकेटमनी’ अशा नाना गोष्टी मुलांनी न मागताही त्यांच्यासाठी वारंवार खरेदी केल्या जातात. अशा वातावरणात वाढलेल्या मुलांना पुढे मानवी भावनांच्या प्रकटीकरणाला पर्याय म्हणून कुठली तरी वस्तू खरेदी करण्याची सवय लागू शकते.
– हल्ली सुट्टीच्या दिवशी सहकुटुंब बाहेर जायचं ठिकाण म्हणजे ‘शॉपिंग मॉल.’ लहान मुलांसह सहकुटुंब शॉपिंग मॉलमध्ये जाणं वाईट नक्कीच नाही. पण ते वारंवार करावं का, आणि लहानपणापासूनच मुलांना गरज नसताना केल्या जाणाऱ्या खरेदीची ओळख करून द्यावी का, यावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं.
– काही व्यक्ती भावनिकदृष्टय़ा दुर्बल, कशानेही लगेच निराश होणाऱ्या असतात. अशा व्यक्तींना आपल्या भावना, आपले विचार व्यक्त करण्यासाठी कोणत्या तरी कृतीच्या माध्यमाची आवश्यकता भासते. यापैकी काही जणांसाठी ती कृती खरेदी असू शकते.

या व्यसनाला आवर कसा घालावा?
खरेदीचं व्यसन असणाऱ्यांना त्याबरोबरीने इतर काही मानसिक समस्या आहे का, ते तपासणं महत्त्वाचं ठरतं. सर्वसाधारणपणे हे व्यसन असलेल्यांमध्ये चिंतारोग आणि नैराश्य आढळतं. पण इतर काही मानसिक आजार नसतील आणि केवळ खरेदीचं व्यसन असेल तर प्राथमिक उपाय म्हणून वैयक्तिक पातळीवर काही गोष्टी करून पाहता येतील.
 – खरेदीची तीव्र इच्छा होत असताना शॉपिंग मॉलपर्यंत जावं, पण आत न शिरता परत फिरावं, किंवा दुकानाबाहेरून वस्तू नुसत्या पाहून परतावं.
– एका वेळेला भरपूर खरेदी करण्यापेक्षा ठरवून थोडीच खरेदी करून दुकानाबाहेर पडावं. यात खरेदी करण्याची इच्छाही पूर्ण होते आणि हळूहळू खरेदीच्या व्यसनापासून दूर जाणं शक्य होऊ शकतं.
– जीवनशैली आरोग्यदायी पद्धतीची असणं खूप आवश्यक आहे. त्यात पोषक आहार, नियमित व्यायाम, योग, प्राणायाम या सर्व गोष्टी आल्या. अशी जीवनशैली मानसिक स्वास्थ्यासाठीही पोषक ठरते.
– लोकांमध्ये मिसळणं, मित्रमैत्रिणींशी, नातेवाईकांशी प्रत्यक्ष संपर्क ठेवणंही गरजेचं आहे. एकटेपणा घालवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो.
– घरातलं किंवा कार्यालयातलं काम सोडून खरेदी करण्याची तीव्र इच्छा होऊ लागते, तेव्हा मात्र काही तरी गडबड आहे, असं समजावं. आपली कमाई आणि गरज नसताना करीत असलेली खरेदी याचा ताळमेळ बसत नसेल तर ती खरेदीचं व्यसन जडल्याची खूण असते. अशा वेळी मात्र वेळीच मानसोपचारतज्ज्ञांचा किंवा समुपदेशकांचा सल्ला घ्यावा.

– डॉ. रोहन जहागीरदार
rohan1080@yahoo.com
शब्दांकन- संपदा सोवनी