News Flash

घरबसल्या वाहन खरेदी; नोंदणीही ऑनलाइन

सध्याच्या स्थितीत वरील सर्व कामे पारंपरिक पद्धतीने पार पाडणे अवघड झाले असते. त्यामध्ये अचूकता, गुणवत्ता व कार्यक्षमता राखणे आव्हान राहिले असते.

अनिल पंतोजी

महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे २० लाखांपेक्षा जास्त खासगी व व्यावसायिक वाहनांची नोंदणी होत असते तर १० लाखांपेक्षा जास्त व्यक्ती वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त करतात. या व्यतिरिक्त वाहन व परवानासंबंधित इतर कामकाजाशी संबंधित शेकडो अर्ज प्रतिदिनी राज्यातील प्रत्येक ‘आरटीओ’ कार्यालयास प्राप्त होतात. अर्जाची छाननी, शुल्क व कर वसुली आणि त्यानंतर कार्यालयीन कार्यवाही अशा प्रकारचे कामकाज होत असते. या व्यतिरिक्त वाहनाची तपासणी व वाहन चालविण्याच्या शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणी ही कामेदेखील केली जातात.

सध्याच्या स्थितीत वरील सर्व कामे पारंपरिक पद्धतीने पार पाडणे अवघड झाले असते. त्यामध्ये अचूकता, गुणवत्ता व कार्यक्षमता राखणे आव्हान राहिले असते. कार्यालयातील संगणकीकरणामुळे वरील आव्हान पेलणे आता शक्य झाले आहे. राज्यातील तसेच देशपातळीवरील सर्व ‘आरटीओ’ कार्यालयांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून ही सर्व कार्यालये एकमेकांशी जोडली गेली आहेत. देशपातळीवर वाहनसंबंधी सर्व कामे parivahan.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून होत असतात. याकामी राष्ट्रीय माहिती केंद्र (ठकउ) प्रणाली विकास, मार्गदर्शन व देशांतर्गत एकच नोंदणी संगणकामध्ये सुस्थितीत ठेवणार आहे. संपूर्ण देशाकरिता एकच पोर्टल / प्रणाली ठेवल्यामुळे कामाचा दर्जा उंचावला आहे, कामाची आदर्श कार्यपद्धती अवलंबली जात आहे तसेच नागरिकांना उच्च प्रतीची सेवा प्राप्त होत आहे.

एकाच प्रणालीमुळे शासन निर्णयांची, ध्येय धोरणांची अंमलबजावणी संपूर्ण देशात त्वरित करता येते. उपलब्ध माहितीची आवश्यकता असणाऱ्या व्यक्ती, संस्थांना देता येते व सर्वात महत्त्वाचे ‘आरटीओ’च्या कामामध्ये पारदर्शकता, सुरक्षितता व विश्वासार्हता वाढविणे शक्य होत आहे. सुधारित मोटार वाहन कायद्यात येत्या काळात ‘आरटीओ’ विभागाचे कामकाज डिजिटल व पेपरलेस होण्याच्या दृष्टीकोनातून अनेक सुधारणा केलेल्या आहेत. यामध्ये अ‍ॅप आधारित रिक्षा व टॅक्सी सेवा देणाऱ्या संस्थांवर नियंत्रण राखण्याकरिता अ‍ॅग्रिगेटर या व्याख्येची तरतूद आहे. तसेच कोणताही नागरिक रहिवाशी असलेल्या राज्यात तात्पुरत्या पत्त्यावर कुठेही लायसन्सकरिता किंवा वाहन नोंदणीकरिता अर्ज करू शकतो. सुधारित कायद्यात डिजिटल कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे कायद्याची अंमलबजावणी इ. तरतुदींचा समावेश आहे व हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

वाहन चालविण्याचा परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी.) संपूर्ण देशात विधीग्राह्य असतात. आपण ज्या राज्यात वास्तव्यास आहात तेथील वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेतदेखील वाढ झाली आहे. वाहन अनुज्ञप्ती, वाहनाची इतर आवश्यक कागदपत्रे (आर.सी., पीयुसी व विमा) सोबत बाळगण्यास विसरलात तर गरसोय टाळण्याकरिता शासनाने डिजीलॉकर व एम.परिवहन ही दोन अ‍ॅप उपलब्ध करून दिली आहेत. ती डाऊनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्याकरिता व तसेच ऑनलाईन इतर ऐच्छिक सेवा प्राप्तीकरिता मोबाइल क्रमांक व आधार कार्ड क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. वरील अ‍ॅपमध्ये डाऊनलोड झालेल्या कागदपत्रांना शासन मान्यता आहे.

करोनामुळे गेले दीड वर्ष कधी टाळेबंदी तर कधी संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे वाहन खरेदी-विक्री व्यवहारांसह ‘आरटीओ’शी संबंधित वाहनचालकांची अनेक कामे रखडली आहेत. प्रत्यक्ष ‘आरटीओ’ कार्यालय किंवा वाहनाच्या दालनात जात येत नसल्याने अनेकांना ही कामे बंद आहेत, असे वाटत आहे, मात्र संगणकीकरणामुळे ही सर्व कामे घरबसल्याही करता येत आहेत. वाहन खरेदीसाठी वाहन विक्रीच्या दालनात जाता येत नाही, मात्र सर्वच वाहन कंपन्यांनी आपली ‘अभासी दालने’ तयार केली आहेत. प्रत्यक्ष वाहन पाहण्यासह त्यासंबंधित खरेदीदारांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन या ऑनलाइन दालनात होत आहे, तर ‘आरटीओ’शी संबंधित कामेही घरबसल्या करता येत आहेत. या संबंधित ऑनलाइन सेवांची माहिती देण्याचा हा प्रयत्न.

आरटीओ कार्यालयात न जाता उपलब्ध सेवा

’ वाहन चालविण्याचा परवाना किंवा वाहन नोंदणीकामी एक किंवा त्यापेक्षा जास्त पत्त्याचा पुरावा अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. अर्जावर आपला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक लिहिणे फायद्याचे आहे. त्यामुळे आपल्या कामातील प्रत्येक टप्प्याची माहिती एसएमएसद्वारे आपणास प्राप्त होते.

’ वाहनासंबंधी कागदपत्रे प्राप्त करण्याकरिता ऑनलाइन अर्ज केला तरी प्रत्यक्षात त्या अर्जाची छापील प्रत कार्यालयात जमा करावी लागते. काही वेळा अर्जदारांना समक्ष हजर राहून ओळख पटवून द्यावी लागते. करोना संकटाच्या काळात ही पद्धत धोकादायक आहे. केंद्र सरकारने याकरिता आधार क्रमांकाचा खरेपणा तपासून, त्याचे प्रमाणीकरण करून कार्यालयात न जाता १६ प्रकारच्या ऐच्छिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये शिकाऊ लायसन्स, लायसन्ससंबंधी ६ विविध सेवा, नोंदणीसंबंधी ७ सेवा व इतर ३ सेवांचा समावेश आहे.

’ आपण नोंदणीकृत मोबाइल क्रमांक व आधार दस्ताऐवजाचे प्रमाणीकरण केल्यास आपल्याला या सेवा घरबसल्या प्राप्त होतील. या उपक्रमाची अंमलबजावणी नजीकच्या काळात होणे अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 12:46 am

Web Title: buying home based vehicle registration is also online ssh 93
Next Stories
1 बाजारात नवीन काय?
2 रोजगाराची नवी संधी… Instagram Reels च्या माध्यमातून करता येणार कमाई
3 टायगर ग्लोबल कडून KOO अ‍ॅपमध्ये ३ कोटी अमेरिकन डॉलरची गुंतवणूक
Just Now!
X