आठवड्यातून एकदा योगा केल्याने पाठीच्या खालच्या बाजूचे दुखणे टळू शकते. पाठदुखीने एकदा पछाडले, की उठणं-बसणं मुश्‍किल होते. आधीपासूनच काळजी घेतली तर आपण हे दुखणे टाळू शकतो. व्यायाम, योगासन व योग्य आहाराच्या मदतीने आपण पाठदुखी नक्कीच टाळू शकतो.
खालच्या बाजूची पाठदुखी सुरू असेल आणि त्यावर काहीच उपचार घेतले नाहीत तर त्याचे रुपांतर भयानक होऊ शकते. त्यामुळे पुढचे दुखणे टाळण्यासाठी योग्य वेळी योग्य उपचार सुरू करणे अत्यंतिक गरजेचे असते. त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते व्यायाम शिकणे, गरज भासल्यास वजन कमी करणे, काही वजन उचलायचे असल्यास ते योग्य त-हेने उचलणे, झोपण्याची किंवा शारिरीक हलचालींची व्यवस्थित पोझ घेणे, ह्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. पण, कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना योग्य ते उपचार घेणे, योगा क्लासेस लावणे, मालिश किंवा एक्यूपंक्चरसाऱखे उपचार करणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी निदान आठवड्यातून एकदा योगा करणे लाभदायक असून त्यांचे पाठीच्या खालच्या बाजूचे दुखणे टळू शकते, असे बोस्टन युनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिन आणि सेंटरच्या संशोधकांनी केलेल्या परीक्षणात आढळले आहे.