अॅसिडहल्ला आणि आगीत होरपळून जखमी झालेल्यांचं पुढचं जीवन अतिशय खडतर असतं. शरीरावर आणि मनावर झालेल्या जखमा सांभाळत पुढचं जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर येते. आपल्या समाजातल्या रूढ असलेल्या कितीतरी समजुतींमुळे त्यांना नोकरी मिळवणं सोडाच पण त्यांच्या जखमा पाहून बसमध्येही त्यांच्या शेजारी बसायला लोकं कचरतात. आपले हे व्रण सगळ्यांपासून लपवत त्यांना रोज वावरावं लागतं.
चेन्नईमध्ये आता एक असा कॅफे आहे जो आगीत जखमी होऊन आयुष्य उध्वस्त झालेल्यांना नोकऱ्या देतो. चेन्नईच्या रोयापेट्टा भागात ‘रायटर्स कॅफे’ नावाने सुरू झालेला या कॅफेमधलं वातावरणही त्याच्या नावाला साजेसंच आहे. अतिशय निवांत वातावरण असलेल्या या कॅफेमध्ये वाचायला अनेक पुस्तकं ठेवली आहेत. इथे येणारे निवांतपणे पुस्तक वाचत गप्पा मारत हवा तेवढा वेळ काढू शकतात.

https://www.instagram.com/p/BPQDj9lhMBK/
या सगळ्या गप्पिष्टांना काॅफी द्यायला असतात आगीत जखमी झालेले पण आपलं आयुष्य धैर्याने जगत पुढे जाणारे पीडित या सगळ्यांना या कॅफेमध्ये काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जातं. आणि हे प्रशिक्षण सुध्दा जगातल्या बेस्ट लोकांकडून दिलं जातं. जर एखाद्या कर्मचाऱ्याला पाककलेतली एखादी गोष्ट शिकायची असेल तर त्यासाठी जगातल्या उत्कृष्ट शेफ्सना बोलावलं जातं. एकदा स्वित्झर्लंडमधून एका फाईव्ह स्टार हाॅटेलमधल्या शेफला ट्रेनिंगसाठी बोलावलं होतं. तर एकदा चाॅकलेट मेकिंग शिकवायला युरोपमधला आणखी एक शेफ आला होता.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे रायटर्स कॅफेमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आपले भाजल्याचे व्रण लपवायचेच असं काहीही बंधन नाहीये. आपल्या आयुष्यातल्या एक मोठ्या संकटातून पुढे येत नव्याने सुरूवात करणाऱ्या या सगळ्यांच्या शरीरावरचे हे घाव युध्दात लढलेल्या सैनिकांच्या जखमांपेक्षा कमी अभिमानकारक नसतात.
एम. महादेवन् या व्यावसायिकाने हा कॅफे उभा केलाय. इथे नोकरीला करू इच्छिणाऱ्यांसाठी सुरूवातीचे तीन महिने ट्रेनिंग आयोजित केलं जातं.
आयुष्यात एका मोठ्या धक्क्याने खचलेल्या या पीडितांना एक नवी उभारी देण्याचं काम ‘रायटर्स कॅफे’ करतोय सकाळी ९ ते रात्री १०.३० पर्यंत सुरू असणाऱ्या या कॅफेमध्ये या वेळेत काम केलंच पाहिजे असंही कर्मचाऱ्यांवर बंधन नाही. त्यांच्या ढासळलेल्या प्रकृतीकडे पाहता ही सवलत योग्यही आहे. पण जिथे आपल्याला स्वाभिमानाने जगायची संधी मिळते तिथे हे सगळेजण झटून काम करतात