भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची डिमांड दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या सेगमेंटमध्ये स्टार्टअप कंपन्या जास्त सक्रिय झाल्याचं दिसत आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअपमधील हैदराबादच्या ऑटममोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सध्याच्या नव्या पिढीला डोळ्यासमोर ठेवत ‘ऑटम वन’ (Atum 1.0) ही इलेक्ट्रीक बाइक बाजारात लाँच केली होती. आजपासून(दि.२ मार्च) या इलेक्ट्रिक बाइकच्या डिलिव्हरीला सुरूवात होत आहे. लाँच झाल्यापासून आतापर्यंत ५०० जणांनी या इ-बाइकसाठी बूकिंग केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. अत्यंत माफक मुल्य, कामगिरीत अजोडपणा आणि तरुणाईला भूरळ घालणारी ‘रेसर डिझाईन’ची ही बाइक प्रामुख्याने सतत वेगावर स्वार होत धावणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी तयार करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

कंपनीचा बाइकचा प्रकल्प तेलंगणामध्ये आहे. ऑटम वन बाइकला इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटीव्ह टेक्नोलॉजीने लो-स्पीड बाईकचा दर्जा बहाल केला असून त्यामुळे ती व्यावसायिक वापरासाठी सज्ज झाली आहे. ऑटम वनला नोंदणीची गरज नसून ती चालविणाऱ्या व्यक्तीला वाहन परवान्याचीही गरज नाही. अगदी लहान मुलेही त्यांच्या स्थानिक भागात प्रवासासाठी ही बाइक वापरु शकतात.

हलकी आणि दमदार बॅटरी : ऑटम वनची बॅटरी वजनाने अतिशय हलकी असून तिचे वजन अवघे 6 किलो आहे. सहज वाहून नेता येणाऱ्या तिच्या डिझाईनमुळे ती नेहमीचे थ्री पिनचे सॉकेट वापरुन कोठेही चार्ज करता येते. ती वापरण्यास अतिशय बचतपुरक असून एका चार्जिंगसाठी अवघ्या एक युनिटची वीज तिला लागते. म्हणजेच 100 किलोमीटरसाठी प्रतिदिन अवघा 7 ते 10 रुपये चार्जिंगचा खर्च लागतो. तर पारंपारिक आयसीई बाइकसाठी 100 किलोमीटरसाठी हाच चार्जिंगचा खर्च जवळपास 80 ते 100 रुपये आहे.

एका चार्जिंगमध्ये 100 किलोमीटर : ऑटम वन बाइकमध्ये सहज बदलता येणारी लिथियम आयन बॅटरी असून ती अवघ्या चार तासात चार्ज होते. बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर किमान 100 किलोमीटर प्रवास करु शकते. बाइकच्या बॅटरीसाठी दोन वर्षाची वॉरंटी असून मोठी मुले, तरुण आणि वयस्कर यांच्यासाठी योग्य पर्याय आहे. विविध रंगात उपलब्ध असलेली ही इको- फ्रेंडली बाइक तिला लागणारी कमी जागा, वापरण्यात सहजता आणि उच्च कामगिरी यात अव्वल आहे. बाइकच्या डिझाईनची अत्यंत खडतर आणि विविध आव्हानात्मक वातावरणात चाचणी घेण्यात आली असून त्यानंतरच तिला रेसरचा फिल आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. या बाइकचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिची उभारणी अस्सल भारतीय बवावटीच्या सुट्या भागांपासून करण्यात आली आहे.

किंमत किती?: ‘ऑटम वन’ या नवीन बाइकची किंमत अवघी 50 हजार रुपये आहे. दणकट आणि रेट्रो- व्हीटांज डिझाईनने सजलेली ही बाइक ई-मोबिलिटीचा चेहरामोहरा बदलेल असं कंपनीने म्हटलं आहे. भारतातील वाहनविक्रीच्या सर्व ऑनलाईन पोर्टलवर बाइक विक्रीसाठी सज्ज झाली आहे. भारतीय इलेक्ट्रीक टू-व्हीलर क्षेत्रात ही बाइक नवीन मापदंड स्थापन करेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.