मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बालकांना दररोज कॅफिनची मात्रा दिल्यास त्यांच्या मेंदूचा विकास आणि फुप्फुसांचे कार्य सुधारण्यास मदत होते, असे संशोधकांना आढळले आहे. यात एका भारतीय वंशाच्या संशोधकाचाही समावेश आहे.

कॅनडातील कॅलगरी विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की, नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ठेवलेल्या २९ आठवडय़ांपेक्षा कमी कालावधीत जन्मलेल्या बाळांच्या जीवनाची सुरुवात चांगल्या रीतीने व्हावी यासाठी त्यांना दररोज कॅफिनची मात्रा दिली जाते.

याबाबतचे संशोधन ‘पेडियाट्रिक्स’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार, जितक्या लवकर बाळाला कॅफिनची मात्रा सुरू केली जाईल, तितके चांगले. कॅलगरी विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक म्हणाले की, नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) प्रतिजैविकांच्या खालोखाल कॅफिनचा सर्वाधिक वापर केला जातो. आपण कॅफिनचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यातून या बाळांना केवळ जीवदान न मिळता त्यांच्या पुढील आयुष्यात चांगले आरोग्य मिळेल हेसुद्धा पाहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोढा यांनी ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ आणि माऊंट सिनाई रुग्णालयाच्या सहकार्याने कॅनडातील २६ ‘एनआयसीयू’मधील बाळांच्या माहितीचे विश्लेषण केले. बाळाला सुरुवातीच्या दिवसांत दिलेल्या कॅफिनचा त्याच्या चेतासंस्थेच्या विकासावर कोणताही दीर्घकालीन दुष्परिणाम होत नाही. याउलट विचारशक्तीचा चांगला विकास, सेरेब्रल पाल्सीची आणि बहिरेपणाची जोखीम कमी होणे याच्याशी त्याचा संबंध दिसून आला. बाळाच्या १८ ते २४ महिन्यांपर्यंतच्या उपचारांची माहिती यासाठी विचारात घेण्यात आली. या कालावधीत मुलांची आकलन क्षमता, भाषा आणि चेतासंस्थेच्या विकासाच्या चाचण्या घेण्यात आल्या.