उष्मांकांच्या (कॅलरी) माहितीसह पुढे केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाच्या चित्रांमुळे केवळ त्या पदार्थाचे आकर्षण कमी होते असे नाही, तर त्या पदार्थाला प्रतिसाद देण्याची मेंदूची प्रक्रियाही बदलते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

‘प्लोस वन’ या पत्रिकेत याबाबतचा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, एखाद्या पदार्थात किती उष्मांक आहेत याचे विवरण त्या पदार्थाच्या चित्रासह दिल्यास त्या पदार्थाविषयी प्रोत्साहित करणारी मेंदूतील यंत्रणा कार्यान्वित होण्याचे प्रमाण कमी होते. याउलट तो पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीची यंत्रणा अधिक प्रमाणात कार्यरत होते. याचाच अर्थ एरवी जो पदार्थ खाण्याची तुमची इच्छा होते, त्याच्यातील उष्मांकांची माहिती वाचताच तो तुम्हाला खाण्यास कमी योग्य वाटू लागतो, असे संशोधकांनी सांगितले.

उष्मांकांविषयी माहिती दिल्यावर तुमचा मेंदू खाद्यपदार्थाची कशी निवड करतो, याचा शोध घेणारा हा पहिलाच अभ्यास असल्याचा या संशोधकांचा दावा आहे. याबाबत स्टॅनफोर्ड विद्यापीठातील डॉक्टरेटोत्तर विद्यार्थी अ‍ॅन्ड्रिया कोर्टनी यांनी सांगितले की, खाद्यपदार्थासोबत त्यांच्यातील उष्मांकांबाबत पत्रक दिल्याने त्यांच्या निवडीबाबत विचार करताना मेंदूच्या प्रोत्साहनात्मक प्रक्रियेत बदल होतो, असे आमच्या अभ्यासातून दिसून येत आहे. हा अभ्यास केला जात असताना अ‍ॅन्ड्रिया अमेरिकेतील डार्टमाउथ महाविद्यालयात पदवीच्या विद्यार्थी होत्या. पोषक आहाराच्या योजनांत संबंधित व्यक्तीचा खाद्यपदार्थाविषयीचा कल लक्षात घेतल्यास त्या यशस्वी होण्याची अधिक शक्यता असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या अभ्यासात १८ ते २२ वर्षे वयोगटातील ४२ पदवीपूर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना १८० खाद्यपदार्थाच्या प्रतिमा आधी उष्मांकांच्या माहितीशिवाय आणि नंतर उष्मांकांच्या माहितीसह दाखविण्यात आल्या. त्या वेळी हे पदार्थ खाण्याची त्यांची किती इच्छा आहे, हे विचारण्यात आले. या वेळी ‘फंक्शनल मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग स्कॅनर’चा वापर करण्यात आला.