मल्टिनॅशनल कंपनीत सी.ई.ओ. या पदाचा भार ५ वष्रे अतिशय कुशलतेने सांभाळणाऱ्या वैजवंतीताईंचे वजन अचानक गेल्या दोन महिन्यांत पाच किलोने वाढले. थोडय़ाशा शारीरिक व बौद्धिक श्रमाने थकवा व दम लागू लागला व मासिक पाळीही अनियमित येऊ लागली. फॅमिली डॉक्टरांनी सर्व तपासण्यांच्या जोडीला थायरॉइडची रक्ततपासणी केली असता हायपोथायरॉइडिझमचे निदान झाले. आजकाल अनेक तरुण व मध्यमवयीन स्त्रियांमध्ये हायपोथायरॉइडिझम व हायपरथायरॉइडिझमचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. या दोन आजारांशिवाय थायरॉइड ग्रंथीचे गॉयटर व थायरॉइड ग्रंथीचा कॅन्सर हे विकारही आढळून येतात.
थायरॉइड (अवटुकाग्रंथी) ही फुलपाखराच्या आकाराची अंत:स्रावी ग्रंथी गळ्याच्या खालच्या बाजूला श्वासनलिकेच्या जवळ असून ती टी 3, टी 4 व कॅल्सिटोनिस या हार्मोन्सचे (अंत:स्रावांचे) रक्तात स्रवण करते. या स्रावांचे प्रमुख कार्य म्हणजे रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण प्राकृत ठेवणे तसेच हृदयाची गती, शरीराचे तापमान व चयापचय क्रिया (मेटॅबॉलिझम) नियंत्रित करणे. आपण सेवन केलेल्या आहाराचे शरीर पोषक अंशात रूपांतर करून शरीरातील सर्व परमाणूंचे, पर्यायाने शरीरधातू व अवयवांचे पोषण करणे व त्यांना आपापली कार्ये करण्यास ऊर्जा प्राप्त करून देणे म्हणजेच चयापचय क्रिया. आयुर्वेदाने या प्रक्रियेत जाठराग्नी (अन्नपचन करणारी यंत्रणा ),धात्वग्नी (आहाररसाचे धातूंचे पोषण करणाऱ्या अंशात परिवर्तन करणारी यंत्रणा) समान वायू (जाठराग्नीला अन्नपचनाच्या प्रक्रियेत सहाय्य करणारा वायू) व व्यान वायू (रक्ताचे सर्व शरीरात अभिसरण करणारा वायू) यांचा महत्त्वपूर्ण सहभाग सांगितला आहे. थायरॉइड ग्रंथीमधून उपरोक्त स्राव रक्तात पसरण्याच्या क्रियेवर नव्‍‌र्हस सिस्टिम म्हणजे मज्जावहसंस्थेचे नियंत्रण असल्याने अवटुकाग्रंथीचे कार्य प्राकृत ठेवण्यात प्राणवायू (शरीरातील प्राणाचे नियंत्रण करणारा वायू) व उदानवायूचेही (शरीरास ऊर्जा देणारा वायू) कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे रेडिएशनशी संपर्क, व्यसने, कॅन्सरची विशेषत: थायरॉइड ग्रंथीच्या व गुदाच्या कॅन्सरची आनुवंशिकता, आहारात आयोडिनचे अल्प प्रमाण, कॅन्सरसाठी रेडिओथेरपी चिकित्सा घेणे, थायरॉइड ग्रंथीच्या गॉयटरसारख्या आजाराचा इतिहास या आधुनिक वैद्यकशास्त्रात वर्णन केलेल्या संभाव्य कारणांशिवाय जाठराग्नी व धात्वग्निदुष्ट करणारा आहार – विहार व मज्जावह संस्थेत विकृत निर्माण करणारा मानसिक ताण ही दोन थायरॉइड ग्रंथीच्या कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत. या कॅन्सरने ग्रस्त रुग्णांच्या आहाराचा व विहाराचा अभ्यास केला असता प्रामुख्याने गोड व तिखट चवीने केळे, मिठाई, हिरवी मिरची, लोणचे असे पदार्थ, मांसाहारासारखे पचण्यास जड पदार्थ अधिक प्रमाणात व वारंवार सेवन करणे, दिवसा जेवणानंतर झोपण्याची व रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय, नियमित व्यायाम न करणे या सवयी बहुतांशी रुग्णांत आढळल्या. याशिवाय अतिशय काळजी करण्याचा स्वभाव, तापट स्वभाव, ताणतणावयुक्त आयुष्य अशी मानसिक कारणेही अनेक रुग्णांत आढळली.
मानेच्या खालच्या भागात सूज येणे, जडपणा किंवा जळजळ जाणवणे, गाठ स्पर्शगम्य होणे, अशक्तपणा, थोडय़ाशा श्रमाने दम लागणे, भूक मंदावणे, आवाज बसणे, झोप न येणे, कोरडा किंवा कफयुक्त खोकला, सर्वागावर सूज येणे, वजन अतिरिक्त व अल्पावधीत वाढणे, प्रामुख्याने ही लक्षणे थायरॉइड ग्रंथीच्या कॅन्सरमध्ये दिसतात. अशा वेळी वैद्यकीय सल्ल्याने रुग्णाचे प्रत्यक्ष परीक्षण, सी.टी.स्कॅन, थायरॉइडस्कॅन, पेटस्कॅन, टी 3 – टी 4 व टीएसएच या रक्त तपासण्या व बायॉप्सी यापकी आवश्यक ती तपासणी केली जाते. पॅपिलरी, फॉलेक्युलर, मेडय़ुलरी व अ‍ॅनाप्लास्टिक या चारही प्रकारच्या थायरॉइड ग्रंथीच्या कॅन्सरमध्ये आधुनिक वैद्यकशास्त्रात शस्त्रकर्म, थायरॉइड हॉर्मोन चिकित्सा, रेडिओअ‍ॅक्टिव आयोडिन, रेडिएशन चिकित्सा व केमोथेरपी यापकी त्या त्या अवस्थेत योग्य चिकित्सा पद्धतींचा अवलंब केला जातो.
आयुर्वेदानुसार जाठराग्नी व धात्वग्नीचे कार्य प्राकृत करणारी व त्याचबरोबर शरीरात साठलेल्या अपाचित, दुष्ट मलभागाचे शरीराबाहेर निस्सरण करणारी त्रिफळा, कांचनार, कुमारी (कोरफड), आरोग्यवíधनी रस, त्रिफळा गुग्गुळ, चंद्रप्रभा वटी, प्रवाळभस्म यांसारखी शमन औषधे; रौप्यभस्म, च्यवनप्राश, सुवर्णभस्म, अगस्तिप्राशासारखी रसायन औषधे उपयुक्त ठरतात. रुग्णाचे बल चांगले असल्यास शरीरातील साठलेल्या दुष्ट कफाचे व पित्ताचे निर्हरण करण्यासाठी वमन व  विरेचन चिकित्सा व मज्जासंस्थेस बल देणारी बस्ति चिकित्सा वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे हितकर ठरते. याशिवाय स्थानिकलेप, औषधी काढय़ांच्या गुळण्या यांचाही सहाय्यक चिकित्सा म्हणून निश्चितच लाभ होतो.
कोणत्याही व्याधीच्या पथ्यापथ्याबाबत आयुर्वेदीय ग्रंथकारांनी मार्गदर्शक सूत्र सांगून ठेवले आहे. ते म्हणजे संक्षेपत क्रियायोगो निदानपरिवर्जनम्। म्हणजे ज्या कारणांनी व्याधी निर्माण होतो त्याचा त्याग करणे हा चिकित्सेतील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे उपरोक्त ज्या ज्या आहार – विहार – मानस कारणांमुळे थायरॉइडचा कॅन्सर होण्याची संभावना आहे, त्यांचा त्याग करून सात्त्विक आहार, सदाचार व  सुविचार यांचे आचरण करणे हितकर!