शरीरात अनियंत्रितपणे वाढणाऱ्या कर्करोगाच्या पेशींचा प्रभाव ओळखणाऱ्या प्रथिनाचा शोध लावल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. संशोधकांनी केलेल्या शोधलेल्या या प्रथिनाचे नाव ‘कॅडरिन-२२’ असे आहे. या प्रथिनामुळे कर्करोगाचा प्रभाव त्वरित ओळखता येणे शक्य असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. ‘कॅडरिन-२२’ हे प्रथिन कर्करोगाचे तातडीने निदान करण्यासाठी सर्वात प्रभावशाली प्रथिन ठरणार आहे, असे कॅनडातील ग्युलेफ विद्यापीठातील जीन युनिके यांनी सांगितले. हे संशोधन ‘ऑन्कोजिन’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे. कमी ऑक्सिजन असलेल्या परिस्थितीत कर्करोगाच्या पेशी वाढतात आणि त्याच वेळी ‘कॅडरिन-२२’ हे प्रथिन या पेशींवर नियंत्रण ठेवते. वेगाने इतरत्र वाढणाऱ्या कर्करोगाच्या पेशींना हे प्रथिन रोखते, असेही संशोधकांनी या वेळी सांगितले. स्तन आणि मेंदूच्या कर्करोगावर संशोधन करण्यात येत असताना ‘कॅडरिन-२२’ या प्रथिनाचा शोध लागला. त्याच वेळी हे प्रथिन कर्करोगाच्या पेशींना रोखत असल्याचेही दिसून आले.