भारतात दरदिवशी कर्करोगाने १३०० लोक मरतात व देशात मृत्यूचे ते प्रमुख कारण आहे. क्षय, संसर्गजन्य रोग व जीवनशैलीशी निगडित रोगानंतर कर्करोग हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. नॅशनल कॅन्सर नोंदणी कार्यक्रमात भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१४ या काळात कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण सहा टक्क्य़ांनी वाढले आहे. २०१४ मध्ये देशात कर्करोगाने ५ लाख जणांचा मृत्यू झाला. एकूण २८,२०,१७९ रुग्णांपैकी ४,९१,५९८ लोक २०१४ मध्ये कर्करोगाने मरण पावले, तर २०१३ मध्ये २९,३४,३१४ रुग्णांपैकी ४,७८,१८० रुग्ण कर्करोगाने मरण पावले होते, तर २०१३ मध्ये ३०,१६,६२८ रुग्णांपैकी ४,६५,१६९ जण कर्करोगाने मरण पावले.

वयस्कर लोकांची जास्त संख्या, अनारोग्यकारक जीवनशैली, तंबाखूचा वापर, अनारोग्यकारक आहार, निदान सुविधांचा अभाव यामुळे कर्करोगाने मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. क्षयाने २०११ मध्ये ६३,२६५, २०१२ मध्ये ६१,८८७, २०१३ मध्ये ५७,०९५ रुग्ण मरण पावले आहेत. सरकारने क्षयरोगाचे मोफत निदान व औषधे उपलब्ध करून दिली आहेत. तसेच एक लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणी व आदिवासी, पर्वतीय भागात ५० हजार लोकसंख्येच्या ठिकाणी मायक्रोस्कोपी केंद्रे सुरू केली आहेत. देशात तेरा हजार मायक्रोस्कोपी केंद्रे असून सहा लाख उपचार केंद्रे आहेत असे सांगण्यात आले.

कर्करोगाची कारणे
*अनारोग्यकारक आहार व जीवनशैली.
*तंबाखू व सिगारेटचा मोठय़ा प्रमाणात वापर.
*निदान सुविधांचा अभाव.