कॉफीच्या सेवनाने कर्करोग, पक्षाघात व मधुमेहाने मृत्यू येण्याची जोखीम कमी होते असा दावा करण्यात आला आहे. रोज एक कप कॉफी तरी त्यासाठी पिणे आवश्यक आहे. जे लोक रोज एक कप कॉफी पितात त्यांची मरण्याची शक्यता कॉफी न पिणाऱ्यांपेक्षा १२ टक्क्यांनी कमी होते. दोन ते तीन कप कॉफी रोज सेवन केल्यास मृत्यूची शक्यता इतरांच्या तुलनेत १८ टक्क्यांनी कमी होते. हे लोक नेहमीची किंवा कॅफीन काढलेली कॉफी प्यायले तरी त्यांच्यात हा परिणाम दिसून येतो, त्याचा कॅफीनशी संबंध नाही असे साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापक व्हेरोनिका सेटियावन यांनी म्हटले आहे. या बाबतचा शोधनिबंध ‘अ‍ॅनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला असून, त्यात हवाई विद्यापीठाचे कर्करोग केंद्र व साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठाचे केक स्कूल ऑफ मेडिसिन यांचे सहकार्य आहे. बहुवांशिक व्यक्तींच्या २१५०० प्रतिनिधींची माहिती घेऊन हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. आतापर्यंत अमेरिकेतील व इतर देशांतील श्वेतवर्णीय वगळता इतर लोकांमध्ये कॉफीचे सेवन व मृत्युदराचा संबंध सांगणारी ठोस माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे तुम्ही श्वेतवर्णीय किंवा आफ्रिकन, अमेरिकन, लॅटिनो किंवा आशियन लोकांनाही कॉफीचा सारखाच फायदा आहे. कंपवात, मधुमेह, यकृतदाह या रोगातही कॉफीने जोखीम कमी होते. कॉफीत अँटिऑक्सिडंट व फेनॉलिक संयुगे असतात ती कर्करोग रोखतात असे सेटियावन यांचे मत आहे.