रक्तचाचणी किंवा उतींच्या तपासणीतून काही मिनिटांत सर्व प्रकारच्या कर्करोगाचे निदान करणारी चाचणी विकसित करण्यात आली असून यात एका भारतीय वैज्ञानिकाचेही योगदान आहे. ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी ही चाचणी विकसित केली असून त्यात सर्व कर्करोगात डीएनएची जी नॅनोरचना असते ती शोधण्यात यश आल्याने निदान शक्य झाले आहे. कर्करोगाचे निदान फार कठीण असते व वेगवेगळ्या कर्करोगाची लक्षणे वेगवेगळी असतात त्यामुळे अनेक चाचण्या कराव्या लागतात पण आता एकाच झटपट चाचणीत सर्व प्रकारच्या कर्करोगांचे निदान शक्य आहे.

आरोग्यवान पेशी व कर्करोगग्रस्त पेशी यांच्यातील फरक ओळखणे कठीण असते तो या चाचणीमुळे पुरेसा स्पष्टपणे दिसून येतो. स्तनाच्या कर्करोगात डीएनएमधील खुणा आम्ही शोधून काढल्या व इतर पुरस्थ ग्रंथी, आतडे तसेच इतर अवयवांच्या कर्करोगातही डीएनएमध्ये दिसणारे बदल शोधून काढले असे क्वीन्सलँड विद्यापीठाचे अबू सिना यांनी सांगितले. यात कर्करोगांच्या वेगवेगळ्या प्रकारात डीएनएमधील मेथील समूहात फरक दिसतात हे मेथील समूहच कोणते जनुक चालू व कोणते बंद करायचे हे ठरवत असतात.

आरोग्यवान पेशीत मेथीलसमूह जिनोममध्ये पसरलेले असतात. पण कर्करोग पेशींचे जिनोम हे काही ठिकाणीच मेथील समूहांचे अस्तित्व दर्शवतात, असे क्वीन्सलँड विद्यापीठाच्या लॉरा  कॅरास्कोसा यांनी सांगितले. जर मेथील समूह काढून ते एका द्रावणात टाकले तर त्यात कर्करोगकारक डीएनएचे तुकडे वेगळे त्रिमिती नॅनोरचनेत दिसतात. हे तुकडे सोने किंवा इतर घटकांना चिकटतात. सोन्याच्या नॅनोकणांचा वापर क रून पेशीत कर्करोगाशी संबंधित नॅनोरचना आहे की नाही हे समजते. जेव्हा कर्करोग पेशी मरतात तेव्हा त्या रक्ताच्या आयनद्रायुत त्यांचे डीएनए सोडून जातात. दोनशे मानवी नमुन्यात या तंत्रज्ञानाने ९० टक्के अचूकतेने कर्करोगाचे निदान झाले आहे.