21 November 2019

News Flash

पावसाळ्यात वाहनांची अशी घ्या काळजी

पावसाळ्यात गाड्यांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स येथे देत आहोत.

मुंबईसह राज्यात सध्या वरूणराजा धो-धो बरसतोय. सर्वजण पावसापासून वाचण्यासाठी म्हणून छत्र्या, रेनकोट, पावसाळी चपला सर्व काही घेतले आहे. एवढेच काय, पावसात आपल्या बाइक-गाडीला काही होऊ नये म्हणून तिच्या सुरक्षेचीही पुरेशी तजवीजही करून ठेवली असेल. पावसाळ्यात गाडय़ांची विशेष काळजी घेणे अधिक गरजेचे असते. कारण याच काळात गाडी घसरण्याचा, गाडीच्या इंजिनात पाणी शिरून ते खराब होण्याचा धोका अधिक असतो. साहजिकच गाडीची काळजी प्रत्येक जण घेतच असतो. पावसाळ्यात गाड्यांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स येथे देत आहोत.

वायपर ब्लेड्स :
पावसाळ्यात वायपरटे काम जास्त वाढते. त्यामुळे पावसाळ्यात वायपर योग्य आहेत ना, हे आधी तपासून घ्यायला हवे. वायपर ब्लेड्सची तपासणी करून ते एक तर बदलणे किंवा योग्यरीत्या बसवून घेणे हे दोनच पर्याय असतात. योग्यरीत्या बसवून घेणे, अशासाठी की कडक उन्हात वायपरचे ब्लेड गाडीच्या काचेला चिकटलेले राहिले तर ते कडक होऊन त्यावरील रबर खराब होण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत ते बदलणेच योग्य असते. नेहमी कारनिर्मात्यांनी सुचवलेले ब्लेड्स वापरणेच सोयिस्कर असते. कारण असे ब्लेड्स दीर्घ काळ टिकणारे असतात. त्यामुळे पावसाळ्यात या गोष्टीवर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. वायपर ब्लेड्सप्रमाणेच वायपर आर्मही तपासून पाहाव्या लागतात. वायपर आर्मच्या बिजागऱ्यांमधील स्प्रिंगही तपासून घ्यावी.

ब्रेक्स :
गाडीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रेक होय. जर नीट ब्रेक व्यवस्थित नसतील तर अपघाताला एकप्रकारे आमंत्रणच म्हणा. त्यामुळे पावसाळ्यात ब्रेक नीट काम करावेत, असे वाटत असेल तर त्याची तातडीने तपासणी करून घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात वेळोवेळी वर्कशॉपमध्ये जाऊन ब्रेक तपासून पहावेत.
ब्रेक ऑइल हे एक प्रकारचे हायड्रॉलिक फ्लुइड असून त्याचे आयुष्यमान दोन वर्षे किंवा २० हजार किमीपर्यंत असते. ते हायड्रोस्कॉपिक असून हवेतील आद्र्रता ते शोषून घेते. त्यामुळे ब्रेकची कार्यक्षमता कमी होऊ शकते. म्हणून योग्य वेळी ब्रेक ऑइल बदलले नसल्यास पावसाने जोर पकडण्याआधी ते बदलणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे ब्रेक पॅड्स, मागील चाकात वापरले जाणारे व्हील सिलिंडर्स आणि हँड ब्रेकची तपासणी आणि योग्य ती मांडणी करून घेणे आवश्यक ठरते.

आऊटसाइड रिअर व्ह्य़ू मिरर :

नवीन तंत्रज्ञानावर आधारलेल्या प्रवासी गाडय़ांमध्ये वातानुकूलित यंत्रणा ऑटोमॅटिक असून गाडीच्या आतील तापमान हे बाह्य़ तापमान लक्षात घेऊन कमी-जास्त केले जाते. त्यासाठी आवश्यक तो सेन्सर काही गाडय़ांमध्ये बाहेरील आरशांमध्ये लावलेला असतो. म्हणून पावसाळा सुरू होताना गाडीबाहेरील आरसे व त्यांचे कव्हर तपासून घेणे आवश्यक असते. बाहेरील आरशांच्या कव्हरला तडा गेलेला असल्यास अथवा ते तुटलेले असल्यास आरशाच्या आतील सेन्सरला पावसाचे पाणी लागून बाहेरील हवा थंड आहे असे सेन्सरकडून निर्देशित केले जाते आणि त्यामुळे गाडीतील वातानुकूलित यंत्रणा बंद पडते.

टायर्स :
पावसाळ्याआधी गाडीच्या सर्व चाकांची काटेकोर तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असून त्यामध्ये टायरची झीज किती व कशी झाली आहे, हे तपासणे अत्यावश्यक असते. त्याचप्रमाणे टायरच्या उभ्या बाजूला (साइड वॉल) मधोमध हवेचा फुगा आला आहे का, टायर फाटले आहेत का, टायरच्या तारा बाहेर आल्या आहेत का, हे सर्व तपासून घेणे अत्यावश्यक आहे. गाडीची व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलेन्सिंग करणेही आवश्यक असते. बहुतांश कारमालक पावसाळा संपल्यावर गाडीचे टायर बदलतात. मात्र सुरक्षेच्या दृश्टीने हे अयोग्य असून पावसाआधी टायर बदलणे आवश्यक आहे. बजेट कमी असल्यास किमान पुढील दोन टायर तरी बदलावेत, गरज असेल तरच.

 (मिलिंद गांगल यांच्या लोकसत्तामधील लेखातून माहिती घेण्यात आली आहे)

First Published on July 8, 2019 1:37 pm

Web Title: car care in monsoon rain nck 90
Just Now!
X